Join us

मुंबई महापालिकेने वाचवले वरळी, प्रभादेवीचे लाखो लीटर पाणी, गळती शोधण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 2:23 AM

Mumbai News : भूमिगत गळती आणि काँक्रिटचा रस्ता असल्यामुळे गळती रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे होते. मात्र जल अभियंता खात्याने दिवसरात्र मेहनत घेऊन ही गळती शोधून दुरुस्ती केली.

मुंबई -  वरळी, प्रभादेवीसह विविध भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या ६६ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून पाण्याची गळती सुरू होती. भूमिगत गळती आणि काँक्रिटचा रस्ता असल्यामुळे गळती रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे होते. मात्र जल अभियंता खात्याने दिवसरात्र मेहनत घेऊन ही गळती शोधून दुरुस्ती केली. यामुळे लाखो लीटर पाण्याची बचत झाली. वरळी, किस्मत सिनेमागृह, साईसुंदर नगर, सेंच्युरी बाजार, सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या ६६ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला प्रभादेवी येथील वीर सावरकर मार्ग व मुरारी घाग मार्ग जंक्शन येथे काही दिवसांपासून गळती सुरू होती. वीर सावरकर मार्ग सिमेंट काँक्रिटचा असल्याने भूमिगत गळतीची कल्पना पालिकेच्या पथकाला येत नव्हती. त्यामुळे दरदिवशी हजारो लीटर पाणी ड्रेनेजमधून वाहून जात होते. पालिकेच्या जल अभियंता खात्यातील पथकाने साऊंड रॉड तंत्राच्या माध्यमातून ही तपासणी केली. जलवाहिनीत गळती असल्याची शंका आल्याने या विभागाच्या अभियंत्यांनी वीर सावरकर मार्गावरील दत्त मंदिरासमोर आणि मुरारी घाग जंक्शनजवळील रस्त्यावर जलवाहिनीच्या चारही बाजूंनी खोदकाम केले. हा अवघड रस्ता फोडून सर्व दक्षता घेत गळतीचा शोध लावण्यात आला. 

अशी सापडली गळतीपाण्याचा दाब कमी असताना रात्रीच्या वेळी जलवाहिनी सर्व बाजूंनी मोकळी करून तपासणी करण्यात आली. त्या वेळी जलवाहिनीच्या तळाशी तीन ठिकाणी गळती आढळली. मोठ्या प्रमाणात पाणी ड्रेनेजमधून वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिन्ही ठिकाणी लाकडाच्या खुंट्या मारून गळतीचा मार्ग बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी एम. एस. टेलपिस वेल्डिंग करून गळती पूर्णपणे बंद करण्यात आली. आता या परिसरामध्ये उच्च दाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होत आहे.  

कर्मचारी - अधिकाऱ्यांचे कौतुकअशा प्रकारची भूमिगत गळती वेळीच निदर्शनास आली नाही, तर ती वाढून रस्त्याचे, आजूबाजूच्या परिसराचे नुकसान होण्याची शक्यता असते. प्रसंगी अपघातदेखील घडू शकतो. मात्र पालिकेच्या पथकाने मोठ्या जबाबदारीने ही मोहीम फत्ते केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका