लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बेस्टचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प माघारी पाठविण्यात आला. बेस्टचा अर्थसंकल्प तुटीचा असल्याने तो परत पाठविण्यात आल्याने आता बेस्टच्या आर्थिक अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ताेट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, यावर जोर दिला जात आहे. या कारणाने बेस्टने २०२१-२२साठी १ हजार ८८७ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मांडला होता. यंदा बेस्टने पहिल्यांदाच विद्युत विभागात तोटा दाखविला आहे. त्यामुळे आता परिवहन विभागासोबतच विद्युत विभागही तोट्यात गेला आहे.
विकासकाकडे असलेली बेस्टची थकबाकी वसूल करावी, असा मुद्दाही मांडण्यात आला. शिवाय वेळेवर बस दाखल होत असल्याने प्रवासी पर्यायी वाहतुकीकडे वळतात, या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. पालिकेने बेस्टला मदत केली. मात्र याबाबतचा खर्च कसा झाला? ही माहिती दिली जात नाही, यावर जोर देण्यात आला. परिणामी स्थायी समिती अध्यक्षांनी हा अर्थसंकल्प बेस्टकडे फेरविचारासाठी परत पाठविला.
* सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर
दुसरीकडे हरकतीच्या मुद्द्यांवर अनेक वेळा उत्तर येत नाही. परस्पर धोरणात्मक निर्णय घेतले जातात. हा मनमानी कारभार आहे. पुढील स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना उपस्थित राहण्याचे आदेश द्या, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. इतर अनेक मुद्द्यांवरूनही सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
.......................