रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो शीतगृह'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 11:25 PM2021-06-08T23:25:49+5:302021-06-08T23:26:45+5:30
एक कोटी लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेतील स्पर्धक अपुऱ्या कागदपत्रांअभावी बाद ठरले.
मुंबई - रशियातील कोविड प्रतिबंधक स्पुतनिक लसींचा साठा मुंबईला मिळवावा, यासाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याशी चर्चा सुरू असून जून अखेरीस थोड्या लसी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लसी साठविण्यासाठी मुंबईत जम्बो शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारण्यात येणार आहे.
एक कोटी लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेतील स्पर्धक अपुऱ्या कागदपत्रांअभावी बाद ठरले. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून स्पुतनिक लसीचे भारतातील वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडून लसींचा काही साठा मिळविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा करण्यासाठी विशेष शीतगृहाची आवश्यकता आहे.
त्यामुळे महापालिकेने स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष शीतगृहासाठी जागेची चाचपणी सुरु केली आहे. कांजुरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
कंजूरमार्गचे कोल्ड स्टोरेजमध्ये कोव्हिशिल्ड लसीचा साठा केला जातो. पण डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजने लस दिली तर जागेची पाहणी करत येईल, पूर्व आणि पश्चिम अशा प्रमाणे विभागून लस साठवता येईल का? यावर चर्चा केली जाईल - किशोरी पेडणेकर (महापौर)
लहान मुलांवर लसीचे प्रयोग....
नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांवर लसीचे प्रयोग केले जात आहेत. मुंबई महापालिकेला अशी परवानगी मिळावी यासाठी केंद्राकडे संपर्क करण्यात आला आहे. मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही, अशी माहिती महापौरांनी दिली.
यासाठी वेगळे शीतगृह...
स्पुतनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांमध्ये स्पुतनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे पालिकेने विचारणा केली आहे. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.