मुंबई : मुंबईतील प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरापासून हाती घेतलेल्या स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेणे, धूळ कमी करण्यासाठी मिस्टिंग मशिनची खरेदी आणि अन्य उपाययोजना, यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. त्यातील केवळ पाण्याच्या टँकरच्या कंत्राटावर आतापर्यंत चार कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, आतापर्यंत २२ हजार २७७ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते धुतले असले, तरी धुळीचे प्रमाण काही कमी झाल्याचे दिसत नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात २१ नोव्हेंबर २०२३ पासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. त्याअंतर्गत विविध विभागांत रस्ते धुणे, दुभाजक, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता तसेच डेब्रिजही उचलले जात आहे.
प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छता राखणे, यासाठी पालिकेने सुमारे ५०० कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली आहे. पालिकेकडे स्वच्छतेसाठी डिझेलवरील २५ स्वीपर मशिन आहेत. तसेच आणखी काही इलेक्ट्रिक स्वीपर मशिनचीही खरेदी केली आहे. दरम्यान, रस्ते धुण्यासाठी पाणी विकत घेतले जात नाही, असा घनकचरा व्यवस्थापन विभागाचा दावा असून पाण्याच्या टँकरचे कंत्राट आणि धूळ कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिस्टिंग मशिनच्या खरेदीवर खर्च झाला आहे, असे या विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
परिमंडळनिहाय खर्च (रुपयांत)
परिमंडळ २- ७२,९८,१००
परिमंडळ २- ६९,१७,४००
परिमंडळ ३- ७२,४६,२६०
परिमंडळ ४-९४,७३,३५५
परिमंडळ ५-५८,३६,८६०
परिमंडळ ६ - ५९,५९,५७५
परिमंडळ ७-५२,१०,८९२
कुठून येते पाणी?
रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत नाही. विभागातील बोअरवेल आणि विहिरींमधून पाण्याचा तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जातो. पालिकेचे स्वतःचे पाण्याचे टैंकर आहेत.
मात्र, काही टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून, त्यासाठी मुंबईतील सात परिमंडळांतील प्रत्येकी परिमंडळात एका कंत्राट- दाराची नियुक्ती केली आहे.
या कंत्राटासाठी चार कोटी ७९ लाख ४२ हजार ४४२ रुपयांची तरतूद केली आहे. हे कंत्राट एक वर्षाचे आहे. नऊ हजार लिटर क्षमतेचे हे टैंकर असून, विभागातील गरजेनुसार त्यांच्या फेऱ्या होतात.