मुंबई : क्षयरोग नियंत्रणासाठी महापालिका पथक घरोघरी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:06 PM2021-11-13T19:06:12+5:302021-11-13T19:06:45+5:30

१५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत राबवली जाणार मोहीम.

Mumbai Municipal Corporation Squad will visit everyone for Tuberculosis Control | मुंबई : क्षयरोग नियंत्रणासाठी महापालिका पथक घरोघरी मोहीम

मुंबई : क्षयरोग नियंत्रणासाठी महापालिका पथक घरोघरी मोहीम

googlenewsNext

क्षयरोग नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचे पथक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. त्यानुसार २४ क्षयरोग जिल्हयांतील ५४ टीबी युनिट परिसरांमधील १७ लाख लोकांची तपासणी होणार आहे. यासाठी १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा ८७६ चमू दारोदारी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. या अभियानादरम्यान क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

पालिकेच्या पथकामार्फत केल्या जाणाऱ्या प्राथमिक तपासणीत आढळणा-या संशयित रुग्णांच्या थुंकीची तपासणी व क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी त्या परिसराच्या जवळपास असणा-या सरकारी किंवा पालिकेच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तर क्ष-किरण चाचणी निर्धारित खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये केली जाणार आहे. यासाठी संशयित रुग्णाला विशेष ‘व्हाऊचर’ देण्यात येणार आहे. ज्यामुळे त्या रुग्णाला ही चाचणी मोफत करुन घेता येणार आहे. 

अशी आहेत क्षयरोगाची लक्षणे....
१४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप किंवा सायंकाळच्या वेळेस ताप येणे, लक्षणीय स्वरुपात वजन कमी होणे, थुंकीमधून रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्यास संबंधितांनी तातडीने पालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातून क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे.

यांनी घ्यावी काळजी....
कुटुंबामध्ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा असल्याचा इतिहास किंवा ज्यांना यापूर्वी क्षयरोगाची बाधा झाली होती, अशा व्यक्तींनी क्षयरोगांच्या लक्षणांबाबत अधिक जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे. क्षयरोग झालेल्या व्यक्तीने नियमितपणे औषाधोपचाराचा कोर्स पूर्ण केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. मात्र यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधोपचार घेणे आवश्यक असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. गोमारे यांनी  सांगितले. 

तपासणी मोहीम ही १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. तर पथकातील कर्मचारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या कालावधीत घरी येणार आहेत. घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास हे चमू दिवसातील इतर वेळी देखील भेट देऊन तपासणी करणार आहेत.

Web Title: Mumbai Municipal Corporation Squad will visit everyone for Tuberculosis Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.