लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याकरिता ओळखपत्र देण्यासाठी अॅप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर महापालिकेच्या विभाग कार्यालयांबरोबरच ६५ रेल्वे स्थानकांवर हे ओळखपत्र दिले जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने क्युआर कोडचे ओळखपत्र संबंधित प्रवाशांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी समन्वय सुरु असून ओळखपत्र देण्यासाठी येत्या दोन दिवसांत हे ॲप तयार होणार आहे. या ॲपवरून क्युआर कोड मिळाल्यानंतर प्रवाशांना लोकलचे तिकीट अथवा पास मिळणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारची टास्क फोर्स, पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. दोन डोसनंतर १४ दिवस झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यावर या बैठकीत एकमत झाले. तर समन्वयासाठी बैठका सुरूच असल्याचेही ते सांगितले.
महामुंबईतील प्रवाशांनाही मिळणार सूट...मुंबईत रेल्वेने दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करीत असतात. आतापर्यंत मुंबईतील १९ लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ठाणे, वसई-विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, मिरा-भाईंदर अशा दहा महापालिका मिळून १३ लाख असे ३२ लाख प्रवासी आहेत. दुसरा डोस घेणार्या नागरिकांची संख्या वाढत राहणार आहे. क्युआर कोड मिळवण्यासाठी या प्रवाशांची विभाग कार्यालयात गर्दी होऊ नये तसेच अन्य पात्र प्रवाशांच्या सोयीसाठी ६५ रेल्वे स्थानकांवर व्यवस्था केली जाणार आहे.
-मुंबईत दोन डोस घेतलेले -१९ लाख-महामुंबईतील प्रवासी - १३ लाख-एकूण - ३२ लाख