मुंबई : पुढच्या आठवड्यात दिवाळी सण असल्याने मुंबई महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजत आहेत. त्यामुळे प्रत्येक मुंबईकर मास्क लावूनच सार्वजनिक ठिकाणी फिरतील, याची खबरदारी पालिकेचे पथक घेणार आहे. विनामास्क फिरणाऱ्या पाच लाख लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न लावणाऱ्या लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. पालिका कर्मचारी यांच्याद्वारे ही कारवाई नियमित सुरू आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांमध्ये तब्बल एक लाख ६० हजार २७९ नागरिकांवर कारवाई करून तीन कोटी ४९ लाख ३४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे.
- मास्क न लावणाऱ्यांना टॅक्सी, बस, कार्यालय, आस्थापना, सोसायटी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्याचा नियम महापालिकेने यापूर्वीच केला आहे. - कोरोनाबाबत जनजागृतीसाठी मुंबईत ७३८ ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये संसर्ग कसा टाळावा, कोणती काळजी घ्यावी, मास्क लावणे का आवश्यक आहे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. जाहिरात कंपनी हे फलक महापालिकेला विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत.