मुंबई पालिकेच्यावतीने शरीरसौष्ठव बरोबरच इतर स्पर्धांचे लवकरच आयोजन - भूषण गगराणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 25, 2024 17:54 IST2024-12-25T17:53:19+5:302024-12-25T17:54:11+5:30
Mumbai Municipal Corporation News: मुंबई महानगर पालिकेत महापौर नसल्यामुळे महापौर चषक स्पर्धा बंद झाली आहे.पण लवकरच त्याचे नियोजन करून आणि पालिकेत महापौर येण्यास विलंब झाला तर पालिका प्रशासनावतीने या स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी काल पार्ले महोत्सव शरीरसौष्ठव स्पर्धा वितरण सोहळ्यात दिली.

मुंबई पालिकेच्यावतीने शरीरसौष्ठव बरोबरच इतर स्पर्धांचे लवकरच आयोजन - भूषण गगराणी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - शरीरसौष्ठव आणि इतर स्पर्धा इतरत्र होत असताना मुंबई महानगर पालिकेत महापौर नसल्यामुळे महापौर चषक स्पर्धा बंद झाली आहे.पण लवकरच त्याचे नियोजन करून आणि पालिकेत महापौर येण्यास विलंब झाला तर पालिका प्रशासनावतीने या स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी काल पार्ले महोत्सव शरीरसौष्ठव स्पर्धा वितरण सोहळ्यात दिली.
महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आणि केंद्र म्हणून पार्ल्याची ओळख आहे.या महोत्सवाविषयी खूप ऐकून होतो. त्यामुळे येथील स्पर्धकांच्या मेहनत आणि सातत्याला मानवंदना देण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पार्ले महोत्सवाचे आयोजक आमदार अँड.पराग अळवणी यांनी त्यांचा सत्कार केला.तर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब यांच्या हस्ते देखील आयुक्तांना सन्मानित करण्यात आले.
आमदार अँड.पराग अळवणी म्हणाले की,पालिका आयुक्तांना व्यायामाची आवड असून त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक अंतर्गत शरीरसौष्ठव आणि इतर स्पर्धा होत असतात. पण सध्या महापौर नसल्यामुळे या स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे स्पर्धकांमध्ये नाराजी आहे. स्पर्धक म्हणून आपण कुठे आहोत, यासाठी स्पर्धा महत्वाची असते. त्यात आता खंड पडला आहे. त्यामुळे आयुक्तांनी तोपर्यंत पालिका आयुक्त चषक स्पर्धा सुरु करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शाम रहाटे, अशोक शेलार, नरेंद्र कदम, जिल्हाध्यक्ष राजेश मेहता, सतीश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.