मुंबई महानगरपालिका उतरवतेय राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर, गोपाळ शेट्टी यांनी महापौरांकडे व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 06:06 PM2021-01-24T18:06:56+5:302021-01-24T18:08:12+5:30
अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून देशातूनच तर विदेशातून सुद्धा मंदिर निर्माण कार्यास श्री राम भक्तांकडून देणगी देण्यात येत आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून देशातूनच तर विदेशातून सुद्धा मंदिर निर्माण कार्यास श्री राम भक्तांकडून देणगी देण्यात येत आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी राम मंदिर उभारण्याच्या कार्याला दिला आहे.
राम मंदिर उभारण्याच्या कार्यासाठी मुंबईतून भाजपा कार्यकर्ते ठिकठिकाणी देणगी गोळा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत आहे. मात्र मुंबई महानगर पालिका व पोलिस राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर काढत असल्या बद्धल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनाप्रमुखांना राम मंदिराबद्धल विशेष आस्था होती. देशात राम मंदिर निर्माण कार्याला काँग्रेस व अन्य पक्षांकडून विरोध होत असताना शिवसेनाप्रमुख व संघ परिवार भाजपाच्या मागे खंबीरपणे उभा होता याची आठवण देखिल खासदार शेट्टी यांनी आपल्या पत्राद्वारे करून दिली आहे.
आपल्या सर्वांसमोर देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम राम मंदिराचे नवनिर्माण होणार ही अभिमानाची बाब आहे. मात्र मुंबई शहरातील काही भागात राम मंदिर अभियानाचे बॅनर पालिका व पोलिसांकडून काढण्यात येत असल्याने राम भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांना आपण योग्य त्या सूचना द्याव्यात अशी विनंती त्यांनी केली आहे.
पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून राम मंदिर निर्माणसाठी निधी संकलनाच्या राष्ट्रीय कार्यात मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून आपण पुढाकार घेऊन सहकार्य करावे अशी विनंती देखिल खासदार शेट्टी यांनी केली आहे.