कोरोनाचा नवीन स्ट्रेन रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:32 AM2021-11-28T10:32:38+5:302021-11-28T10:34:09+5:30

Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभर खळबळ उडविली आहे. या नव्या विषाणूचा शिरकाव मुंबईत टाळण्यासाठी महापालिका यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. त्यानुसार आफ्रिकेतून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करून त्यांचे अलगीकरण करण्यात येणार आहे.

Mumbai Municipal Corporation vigilant to prevent new strain of corona | कोरोनाचा नवीन स्ट्रेन रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क

कोरोनाचा नवीन स्ट्रेन रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क

Next

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभर खळबळ उडविली आहे. या नव्या विषाणूचा शिरकाव मुंबईत टाळण्यासाठी महापालिका यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. त्यानुसार आफ्रिकेतून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करून त्यांचे अलगीकरण करण्यात येणार आहे. तसेच बाधित प्रवाशांचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करून त्यांच्या नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (जीनोम स्क्विन्सिंग) पडताळण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसार सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के एवढा आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील कोविडच्या नव्या प्रकाराने पुन्हा मुंबईचीदेखील चिंता वाढवली आहे. या नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाची महत्त्वाची ऑनलाइन बैठक शनिवारी संध्याकाळी बोलविण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पोलीस प्रशासनाचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी, सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

आढावा बैठकीत आखलेल्या उपाययोजना...

- नवीन कोविड विषाणू आढळलेल्या आफ्रिकन देशांंमधून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आल्यास त्यांचा पासपोर्ट काटेकोरपणे तपासणार.

- संबंधित प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय चाचणी करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांचे अलगीकरण केले जाणार.

- एखादा प्रवासी बाधित आढळल्यास त्याचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करणार, बाधित नमुन्यांचे जीनोम स्क्विन्सिंग पडताळणार.

प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासणार...
मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील १५ दिवसांच्या प्रवासाची माहिती घेतली जाणार आहे. त्यांचे पासपोर्ट विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत बारकाईने तपासले जाणार आहेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.

जम्बो कोविड केंद्रांची चाचपणी...
पालिकेने उभारलेल्या सर्व जम्बो कोविड केंद्रांची फेरपाहणी केली जाणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.

लसीकरण टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा...
कोविड विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, असे वारंवार बजावूनही नागरिक बेफिकीरपणे वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योग्य प्रकारे मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पुन्हा कडक कारवाई सुरू करावी. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर द्यावा. विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपटगृहे अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title: Mumbai Municipal Corporation vigilant to prevent new strain of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.