मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी ७३ कोटी ५३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. मात्र, कंत्राटातील करारानुसार दोष दायित्व असतानाही खड्डे पडल्याबद्दल संबंधित कंत्राटदारांकडूनच खर्च वसूल केला जातो का, दोष दायित्व कालावधी संपला नसेल तर त्याच्यावर कारवाई होते का, अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकले जात नाही, असा सवाल केला जात आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी ७३ कोटी ५३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यानंतर शहर आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे खड्डे बुजवण्यासाठी २०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडची दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानाने बुजवण्यासाठी निविदा मागवली आहे. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, अजून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू झालेली नाहीत.
पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची कामे करू नयेत असे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्याने पावसाळ्यानंतरच ही कामे सुरू होतील. यंदाच्या पावसाळ्यातही रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता अधिक आहे. खड्डे बुजविण्यासाठी मार्चमध्ये तब्बल १८० कोटींच्या, तर एप्रिलमध्ये ६० कोटींहून अधिक खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. या कंत्राटाच्या अंतर्गत ९ मीटरपेक्षा कमी आणि जास्त रुंदी असलेल्या शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्यात येणार आहेत. खड्डे बुजवण्यासाठी २०० कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे.
कंत्राटदारांच्या कामावर प्रश्नचिन्हया खर्चास वॉचडॉग फाउंडेशनने आक्षेप घेतला आहे. मुळात रस्त्यांचे कामे करताना करारात दोष दायित्व कालावधी निश्चित केलेला असतो. त्या कालावधीत खड्डे पडल्यास कंत्राटदाराला जबादार धरले जाते. त्याच्याकडून त्याच्याच खर्चाने कामे करून घेतली जातात. प्रसंगी त्याला काळ्या यादीत टाकले जाते. या प्रकरणात दोष दायित्व कालावधी संपला आहे का, असा सवाल फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटो यांनी केला. मुळात खड्डे बुजवताना ते इंडियन रॉड काँग्रेसच्या निकषानुसार बुजवले जाणे आवश्यक असते. परंतु एकही खड्डा निकषाप्रमाणे बुजवला जात नाही. त्यामळे खड्डे बुजवलेला एकही रस्ता समतल नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.