मुंबई महापालिका उभारणार पक्ष्यांचे घर; विदेशी प्रजातीचे पक्षी न्याहाळण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:07 PM2023-11-09T12:07:59+5:302023-11-09T12:08:14+5:30
विविध रंगांचे, विविध प्रजातींचे पक्षी पाहण्यासाठी उपनगरवासीयांना उपनगरातच पक्ष्यांच्या घराला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई :
विविध रंगांचे, विविध प्रजातींचे पक्षी पाहण्यासाठी उपनगरवासीयांना उपनगरातच पक्ष्यांच्या घराला भेट देण्याची संधी मिळणार आहे. नाहूरला मुंबई महापालिका खास पक्षिगृह उभारत असून या पक्षिगृहात विदेशी प्रजातीचे पक्षी न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरच उपनगरात पक्ष्यांची मंजुळ किलबिल कानी पडेल. ऐरोलीच्या खाडीत फ्लेमिंगो पक्षी आणि नाहूरमध्ये पक्ष्यांचे घर असा दुहेरी योग जुळून येणार असल्याने पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणीच असेल.
सध्या भायखळ्याच्या वीर जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात प्राण्यांसोबत पक्षीही पाहायला मिळतात. मात्र त्यासाठी थेट दक्षिण मुंबईत यावे लागते. ती अडचण नाहूरच्या प्रस्तावित पक्षिगृहामुळे दूर होईल. या पक्षिगृहाचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षिगृहाची रचना कशी असावी, परदेशी पक्ष्यांसाठी गृहातील वातावरण कशा पद्धतीचे असावे, यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.
नाहूरच का?
या ठिकाणी खारफुटीचे मुबलक जंगल आहे. या पट्ट्यातील वातावरण जैव विविधतेसाठी अनुकूल आहे. ऐरोलीच्या खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांचा विहार असतो. त्यामुळे याठिकाणी फ्लेमिंगो सफारीचे आयोजनही केले जाते. हा परिसर पक्ष्यांसाठी पोषक मानला जातो. वर्दळीपासून हा परिसर दूर असल्याने वातावरण पोषक आहे.
कोणते पक्षी असतील या घरात?
हे पक्षिगृह खास करून विदेशी प्रजातींच्या पक्ष्यांसाठी उभारले जात आहे. या ठिकाणी भारतीय पक्षी नसतील. त्यामुळे कधीही न पाहिलेले विदेशी पक्षी पाहायला मिळतील. हे पक्षी विविध देशांतून आणले जातील. भारतीय वातावरणात कोणते पक्षी तग धरू शकतील, हे लक्षात घेऊन तेच पक्षी आणले जातील.