संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या हजारो कोटी रुपयांच्या औषधाची खरेदी आता एकाच ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणावरून रुग्णालयाच्या गरजेप्रमाणे लागणाऱ्या औषधाचा पुरवठा मध्यवर्ती केंद्रातून केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या स्तरावर खरेदी थांबणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. पालिकेमार्फत चार वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालये, एक दंत महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. २०२ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानादेखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्णालयांमध्ये ७,१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४,०००, विशेष रुग्णालयात ३,००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत.
सध्या काय? सध्या पालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाने दर करार पत्रक बनवून दिल्यावर अधिष्ठाता त्याप्रमाणे रुग्णालयाच्या गरजेप्रमाणे औषधांची खरेदी करत असतात. तसेच त्या औषधांचा व्यवहारसुद्धा अधिष्ठातांच्या स्तरावर रुग्णालय प्रशासनातर्फे केला जातो. त्याची सर्व बिले रुग्णालयाच्या कार्यालतूनच काढली जातात. तसेच ती औषधे कमी पडली तर विशिष्ट रकमेच्या मर्यादापर्यंतचे लोकल पर्चेस करण्याचे अधिकार त्यांना आहेत.
सध्या रुग्णालय स्तरावर औषधांची खरेदी होत आहे. या प्रक्रियेत खूप वेळ जात आहे. रुग्णालय प्रशासनावर या कामाचा अतिरिक्त बोजा आहे. त्यामुळे प्रचलित पद्धत बंद करून आता सर्व रुग्णालयांच्या औषध खरेदी एकाच ठिकाणी करण्यात येईल. रुग्णालयाच्या गरजेप्रमाणे त्या मध्यवर्ती केंद्रातून सर्व रुग्णालयांना औषधाचा पुरवठा हाेईल.- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त आरोग्य
नवीन प्रस्तावानंतर काय होईल? पालिका प्रशासनाच्या नवीन प्रस्तावाप्रमाणे सर्व रुग्णालयांना लागणार औषधाची खरेदी ही एकाच ठिकणी होईल. त्यानंतर रुग्णालयाच्या गरजेप्रमाणे त्यांना मध्यवर्ती केंद्रातून त्यांना पुरवठा केला जाईल. हे केंद्र मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणावरून असून, त्या सर्व रुग्णालयांना या ठिकाणावरून औषधाचा साठा पुरविला जाणार आहे. एकाच ठिकाणी खरेदी प्रक्रिया झाल्यामुळे औषधांच्या किंमत कमी होऊन याचा रुग्णांना फायदा होईल. तसेच रुग्णालय प्रशासनाला यापुढे औषध खरेदीसंदर्भातील कोणतेही प्रशासकीय काम करण्याची गरज भासणार नाही.