Join us

मुंबई महानगरपालिका आता सांगणार धोक्याची पूर्वसूचना; जी २० शिष्टमंडळ भेटी दरम्यान पालिकेची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:43 PM

आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्वरित  कारवाई करता यावी, यासाठी विविध धोक्यांची पूर्वसूचना देणारी प्रणाली  विकसित करण्याची  प्रक्रिया सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला असून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. याचाच एक भाग म्हणून १२० पेक्षा अधिक प्रतिनिधींच्या जी २० शिष्टमंडळाने मंगळवारी पालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी नियंत्रण कक्ष भेटी दरम्यान त्यांना पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग ‘यूएनडीपी’ च्या सहकार्याने, बहुविध धोक्यांचा समावेश असलेली जोखीम मूल्यांकन योजना तयार करत असल्याची माहिती देण्यात आली. 

   ही योजना निर्णय समर्थन प्रणालीसाठी ‘आर्कजीआयएस  प्लॅटफॉर्म’ वर उपलब्ध असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्वरित  कारवाई करता यावी, यासाठी विविध धोक्यांची पूर्वसूचना देणारी प्रणाली  विकसित करण्याची  प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नागरिकांसाठीही ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने १००० स्वयंसेवकांना प्रशिक्षित केल्याची माहिती  शिष्टमंडळाला नियंत्रण कक्षाच्या भेटी दरम्यान दिली. 

सदस्यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. त्यावेळी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. मुंबईवर आजवर आलेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेली कामगिरी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची सुसज्जतायाची माहिती दिली.

पालिकेचा हेरिटेज वॉक शिष्टमंडळाने पालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा ‘हेरिटेज वॉक’ केला. मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तूरचना, इतिहास आदींबाबत इत्थंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली. पालिकेच्या भव्यदिव्य अशा या वास्तूरचनेचे मूळ रुप जपण्यासाठी महानगरपालिकेने आजवर केलेल्या प्रयत्नांचे देखील पाहुण्यांनी कौतुक केले. वडापाव, पाणीपुरीवर पाहुण्यांचा ताव शिष्टमंडळासाठी छोटेखानी स्वागत सोहळा झाला. पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा यावर पाहुण्यांनी ताव मारला.

राग ‘हंसध्वनी’ची फर्माईश  कोर्टयार्ड परिसरात पाहुण्यांसाठी खास बासरीवादन ठेवले होते. पंडित भूपेंद्र बेलबन्सी बासरीवर यमन राग वाजवत असताना पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या रागाचा आनंद घेतला.    त्यानंतर लागलीच पाहुण्यांनी पंडित बेलबन्सी यांना राग ‘हंसध्वनी’ वाजवण्याची फर्माईश केली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका