मुंबई महापालिकेच्या ठेवी ९८ हजार कोटींवरून ९ हजार कोटींवर येणार; अर्थसंकल्पावरील दाव्यामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:20 IST2025-02-04T16:19:12+5:302025-02-04T16:20:12+5:30
Mumbai Budget 2025: मुंबई महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे हे स्पष्ट झाले आहे. कारण यंदाचे आकडेच सांगत आहेत. - रईस शेख

मुंबई महापालिकेच्या ठेवी ९८ हजार कोटींवरून ९ हजार कोटींवर येणार; अर्थसंकल्पावरील दाव्यामुळे खळबळ
देशाची आर्थिक राजधानी आणि आशियातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आज भला मोठा अर्थसंकल्प सादर झाला आहे. महापालिकेची निवडणूक न झाल्याने यंदाही प्रशासकांनीच हा अर्थसंकल्प मांडला आहे. हा अर्थसंकल्प तब्बल ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प तब्बल १४.१९ टक्क्यांनी वाढला आहे. असे असले तरी महापालिका दिवाळखोरीत निघाल्याचे स्पष्ट झाल्याचा मोठा दावा सपाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.
मुंबई महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे हे स्पष्ट झाले आहे. कारण यंदाचे आकडेच सांगत आहेत. पालिकेला आता ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्या मोडायची वेळ आली आहे. २ लाख ३२ हजार ४०० कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. मात्र, त्या देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा शिल्लक नाहीय. यामुळे आता ठेवी तोडायची वेळ आली आहे. ज्या प्रकारे या ठेवी आता ९८ हजार कोटींवरून ९ हजार कोटींचे डिपॉझिट उरणार आहे. समोर एक लाख नव्वद हजार करोडचे देणे आहे, असा आरोप शेख यांनी केला.
याचबरोबर आताची ही परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेकडे पुढील चार वर्षांत कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासही पैसे नसतील, असा इशाराही त्यांनी केला आहे. पालिका जे निर्णय घेत आहे ते त्यांनी वेबसाईटवर टाकावेत यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून भांडत आहे. आतातरी पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणावी अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करत असल्याचे शेख यांनी सांगितले.
मुंबईकरांना काय काय मिळणार? आणि कोणत्या तरतूदी?
- दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या उन्नत मार्गासाठी ४३०० कोटींची तरतूद
- गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १९५८ कोटी रुपयांची तरतूद
- प्रभादेवी , भांडूप ,मुलुंड, जुहू , मालाड येथील एकूण ३२७८२ PAP सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी
- दहिसर जकात नाक्याच्या जागेवर फाइव्ह स्टार हॉटेल उभारणार
- राणीच्या बागेत जिराफ ,झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार इत्यादी विदेशी प्राणी आणणार
- मुंबईमध्ये सुयोग्य जागी 'लंडन आय'च्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारणार
- विशेष वातावरणीय बदलासाठी ११३.१८ कोटी
- पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ४००० कोटी रुपयांची तरतूद
- बेस्ट प्रशासनाठी १००० कोटींची तरतूद
- कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी २५ कोटींची तरतूद
- आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ३०९ कोटींची तरतूद