गुजरातला स्वच्छतेसाठी मुंबई पालिकेचे मॉडेल; महिला प्रतिनिधींकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:54 AM2023-03-28T10:54:26+5:302023-03-28T10:54:47+5:30
महापालिकेची मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छतेची कामे पाहून प्रभावित झालेल्या प्रतिनिधींनी मुंबईतील कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
मुंबई : विविध स्वच्छताविषयक कार्य, लोकसहभागातून साधलेली कचऱ्यापासूनची खतनिर्मिती आणि अत्यंत चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ठेवलेली स्वच्छता अशी मुंबई महापालिकेने केलेल्या पर्यावरणपूरक आणि सुशोभिकरणाच्या कामाचे कौतुक गुजरातहून आलेल्या प्रतिनिधींनी केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत खास दोन दिवसांच्या ‘स्वच्छता यात्रा’ मुंबई भेटीवर महिला प्रतिनिधी आल्या आहेत. स्वच्छतेची शपथ मराठी भाषेतून घेत त्यांनी मुंबई पालिका कामांच्या धर्तीवर गुजरातमध्ये काम करण्याचा निर्धारही केला.
महापालिकेची मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छतेची कामे पाहून प्रभावित झालेल्या प्रतिनिधींनी मुंबईतील कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. या दौऱ्यावेळी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे विशेष कार्य अधिकारी तसेच स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी, गुजरातमधील स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापक जिग्नेश पटेल, गुजरातच्या प्रकल्प व्यवस्थापक भावना मिश्रा, विविध स्वयंसेवी संस्था, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, पालिकेच्या नियोजन खात्यातील शहर अभियान व्यवस्थापक विभा जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता पानसकर व पिंपळे, समुदाय संघटक रश्मी कवे आदी उपस्थित होते. या स्वच्छता यात्रेची सुरुवात अंधेरी पश्चिमेतून झाली. यावेळी मुंबईतील स्वच्छताविषयक आव्हाने आणि अभिनव उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी याचे कौतुक केले.
या दौऱ्यात प्रकल्प बघून प्रभावित झाल्याची भावना बडोदा येथील सखी महिला मंडळाच्या अध्यक्ष आशा दवे यांनी व्यक्त केली. तर गांधीनगर येथून आलेल्या भावना मिश्रा यांनी पालिकेचे कार्य हे खऱ्या अर्थाने सर्वस्तरापर्यंत पोहोचविणार असल्याचे नमूद केले.
अहमदाबादच्या वर्षा माली यांनी ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम ॲण्ड ऑरगॅनिक फार्मिंग’ विषयक प्रकल्पांचा आवर्जून उल्लेख केला. गुजरात स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापक जिग्नेश पटेल यांनी महापालिकेच्या धर्तीवर गुजरातमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणार असल्याचे आवर्जून नमूद केले.