महापालिकेची ‘एकच लक्ष्य…एक लक्ष’ मोहीम यशस्वी, शाळांमध्ये एक लाख मुलांनी घेतले प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 06:51 AM2022-07-12T06:51:30+5:302022-07-12T06:52:11+5:30

३१ जुलैपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सद्य:स्थितीत पालिकेने एक लाख दोन हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात यश मिळविले आहे.

mumbai Municipal Corporations One Goa One Lakh campaign successful one lakh children enrolled in bmc schools english marathi urdu | महापालिकेची ‘एकच लक्ष्य…एक लक्ष’ मोहीम यशस्वी, शाळांमध्ये एक लाख मुलांनी घेतले प्रवेश

महापालिकेची ‘एकच लक्ष्य…एक लक्ष’ मोहीम यशस्वी, शाळांमध्ये एक लाख मुलांनी घेतले प्रवेश

Next

मुंबई : पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची सातत्याने होणारी गळती लक्षात घेऊन यंदा पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या ‘एकच लक्ष्य… एक लक्ष’ मोहीम वेळेआधीच यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सद्य:स्थितीत पालिकेने एक लाख दोन हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात यश मिळविले आहे. यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३२ हजार प्रवेश झाले असून, सगळ्यात कमी प्रवेश मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये झाले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये एकूण प्रवेशांपैकी १७ हजार ५०० प्रवेश झाले आहेत. दरम्यान, ही प्रवेश संख्या अंतिम नसून यात ३१ जुलैपर्यंत आणखी वाढ होईल असा विश्वास शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या घटत्या पटसंख्येमुळे नेहमीच शिक्षण विभागाला लक्ष्य केले जाते. मात्र, मागील वर्षी कोरोना काळातही मुंबई महापालिका शाळांच्या पटसंख्येत २९ हजारांनी वाढ झाली. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात महापालिका शिक्षण विभागाच्या पटसंख्येत तब्बल एक लाखांचे प्रवेश वाढविण्याचे आव्हान पालिका शिक्षण विभागाने स्वीकारले आहे. 

पालिका शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वस्तीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याच्या तसेच शाळाबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिसरामध्ये जाऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती देत त्यांना माहिती दिली. 

  • पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मिळून ९ जुलैपर्यंत १ लाख २ हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.  
  • नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी पुढे शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील यासाठी त्यांना सर्व सुविधा, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धेत टिकून राहणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावे अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
  • शिवाय शिक्षणाप्रमाणेच शाळांतील स्वच्छता, इमारती, वर्ग आकर्षक करावेत अशा सूचनांचा समावेशही केला आहे.
     

मराठी माध्यम १७,५००
हिंदी माध्यम  २७,५००
उर्दू माध्यम २३,५००
इंग्रजी माध्यम ३२,०००

नवीन प्रवेशांसाठी कर्मचाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत शिवाय मुख्याध्यापकांनीही प्रयत्न केले असून वेळेआधी नवीन प्रवेशाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाकडून राबविली जाणारी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची मोहीम सुरू आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलैपर्यंत निश्चितच या संख्येत वाढ होईल.            
राजेश कंकाळ, 
शिक्षणाधिकारी, पालिका शिक्षण विभाग

Web Title: mumbai Municipal Corporations One Goa One Lakh campaign successful one lakh children enrolled in bmc schools english marathi urdu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.