Join us

मुंबई महापालिकेच्या खुलाशाने आणखी संशय वाढविला : प्रवीण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:07 AM

मुंबई : क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्या आणि कोरोना मृतांची नोंद अन्य कारणांमुळे झालेल्या मृतांच्या वर्गवारीत दाखविण्याचा ...

मुंबई : क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्या आणि कोरोना मृतांची नोंद अन्य कारणांमुळे झालेल्या मृतांच्या वर्गवारीत दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात आकडेवारीसह दाखवून दिले होते. यावर, मोघम स्वरूपाचे उत्तर देत मुंबई महापालिकेने आणखी संशय वाढविल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात तारखांसह उदाहरणे देत कोरोना आकडेवारीतील बनाव स्पष्ट केला होता. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महापालिकेने आणखी संशय वाढविला आहे. कोरोनाच्या मृत्यू आकडेवारीसंदर्भात तर काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे आपली चूक कबूल करण्याचा प्रयत्न महापालिकेने केलेला दिसून येतो, असे दरेकर यांनी पालिकेच्या खुलाशावर म्हटले. मासिक आकडेवारी देऊन नेमके दुसऱ्या लाटेत काय गौडबंगाल होत आहे, हे सोयीस्करपणे झाकण्याचा दुर्दैवी प्रयत्न मुंबई महापालिकेने या खुलाशातून केला आहे. महापालिकेने या खुलाशात दिलेल्या माहितीप्रमाणेच आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३.४३ टक्क्यांपर्यंत कसा गेला, हे मान्य केले आहे. मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११.२३ टक्के आणि एप्रिलमध्ये तो १८.०६ टकक्यांपर्यंत गेला, ही माहिती मुद्दाम दिली नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत असल्याचे दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते पत्र लिहितात, तेव्हा त्याला मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर देणे अपेक्षित आहे. हा मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचा जो प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिल्याचे सांगत दरेकर यांनी या पालिकेच्या खुलाशावर नाराजी व्यक्त केली.