मुंबई महापालिकेची शाळा जगात भारी ...! भारतातील उत्कृष्ट १० शाळांमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 02:36 PM2023-06-16T14:36:56+5:302023-06-16T14:37:07+5:30
मुंबई महानगरपालिकेची दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस. या शाळेची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगरपालिकेची दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस. या शाळेची ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ स्पर्धेत अव्वल दहा शाळांमध्ये निवड झाली आहे. वर्ल्ड बेस्ट स्कूल’ ही स्पर्धा ब्रिटनमधील ‘टी ४’ एज्युकेशन संस्था भरवत असून या स्पर्धेत जगभरातील शाळा सहभागी होतात.
याबाबत ‘टी ४’ एज्युकेशन संस्थेने गुरुवारी जगभरातील सर्वोत्कृष्ट शाळांची निवड जाहीर केली. या शाळांमध्ये पालिकेच्या दादर येथील शिंदेवाडी एम. पी. एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ म्हणून भारतातील अव्वल दहा शाळांमध्ये निवड झाली आहे. आकांक्षा फाउंडेशनने ही शाळा दत्तक घेतली असून, या फाउंडेशनकडून शाळेला संपूर्ण शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये सहकार्य केले जाते.
कोविडनंतर शाळा सुरू झाल्यावर शिंदेवाडी एम. पी. एस. शाळा प्रशासनाला काही विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तक्रारी जाणवल्या आणि त्यात शाळेतील २५६ मुलांचे वजन कमी झाल्याचे निदर्शनास आले. या मुलांचे वय, उंची आणि वजनाच्या प्रमाणात तफावत दिसून आली. या २५६ पैकी १०३ मुलांचे वजन खूपच कमी होते. दरम्यान, या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांच्या पालकांचे शाळेने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) या संस्थेकडून प्रबोधन केले. त्यांच्या आहाराविषयी पालकांमध्ये जनजागृती केली तसेच वजन कमी असलेल्या मुलांची आरोग्य पत्रिका (हेल्थकार्ड) बनवून त्यावर दैनंदिन नोंदी घेतल्या. दर तीन महिन्यांनी मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मध्यान्ह भोजनासह मुलांच्या आहारात फळांचाही समावेश केला. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाची संस्थेने दखल घेतल्याचे मुख्याध्यापिका साक्षी भाटिया यांनी सांगितले.
३ उत्कृष्ट शाळांची निवड होणार
पालिका आयुक्त आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. या प्रयत्नांतून दादर येथील शाळेची निवड झाली आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील या दहा शाळांमधून तीन अव्वल शाळा निवडण्यात येणार आहेत. जगभरातील शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेवून असे उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण संस्थांचा गौरव करण्यासाठी ब्रिटनमधील ‘टी ४’ ही संस्था काम करते. यंदा या संस्थेने पर्यावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसमूह आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रोत्साहन अशा क्षेत्रात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची निवड केली होती.