मुंबई: मालमत्ता कर थकविणाऱ्या निवासी व व्यावसायिक ग्राहकांना कारवाईचा बडगा दाखविण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. मंगळवारी वरळी येथील व्यावसायिक थकबाकीदाराने २८ वर्षांनंतर तब्बल तीन कोटी २२ लाख रुपये भरले, तर बोरीवली येथे एका गृहनिर्माण संस्थेची जलजोडणी खंडित करण्याची कारवाई करताच संबंधितांनी १६ लाख २४ हजार ६० रुपये पालिकेकडे जमा केले.
२०२० - २१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ५२०० कोटी रुपये जमा करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. त्यानंतरही मालमत्ता कर न भरणाऱ्या ग्राहकांची जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने अशा महागड्या वस्तू जप्त करणे यांसारखी कारवाई करण्यात येत आहे.
वरळी येथील ‘मे. नॅशनल कॉटन प्रॉडक्ट’ यांच्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा मालमत्ता कर १९९२ पासून थकीत होता. ही रक्कम तीन कोटी ६१ लाख ४७ हजार ३८ रुपये होती. पालिकेच्या कर निर्धारक व संकलक विभागाचे अधिकारी कारवाईसाठी गेले असता संबंधित थकबाकीदाराने तीन कोटी २२ लाख ५२ हजार ४५९ रकमेचा धनादेश पालिकेकडे सुपूर्द केला. कारवाईचा बडगा उगारताच १६ लाख २४ हजार रुपये थकवणाऱ्या बोरीवली (पूर्व) येथील कृपाधाम गृहनिर्माण संस्थेने लगेच ही रक्कम भरली.
थकबाकीदारांची जलजोडणी खंडित मुलुंड येथील ‘वर्धन हॉल’ यांच्याकडे ९५ लाख ७८ हजार ४०९ रुपये मालमत्ता कराची थकबाकी आहे. नोटीस पाठवूनही मालमत्ता कर न भरल्याने महापालिकेने त्यांची जलजोडणी खंडित केली. घाटकोपरमधील ‘दीप्ती सॉलिटेअर कमर्शिअल प्रॉपर्टी व श्रीपाल कॉम्प्लेक्स कमर्शिअल प्रॉपर्टी’ यांच्याकडे अनुक्रमे १७ लाख ३९ हजार ५३६ आणि ४९ लाख २२ हजार ३७५ एवढ्या मालमत्ता कराची थकबाकी होती. दोन्ही मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली.