मुंबई महापालिकेचा मलिष्कावर भरोसा नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 09:37 PM2017-07-18T21:37:30+5:302017-07-18T23:52:23+5:30
पावसाळ्यात मुंबईत उडणा-या दैनावर प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्का हिचे गीत सत्ताधारी शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - पावसाळ्यात मुंबईत उडणा-या दैनावर प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्का हिचे गीत सत्ताधारी शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. या गितामुळे महापालिकेचीच नव्हे तर मुंबई शहराची जागतिक स्तरावर बदनामी होत आहे. त्यामुळे मलिष्कावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे आज केली. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन विधी खात्याचे मत मागविले असल्याचे सुत्रांकडून समजते. तसेच मलिष्काविरोधात ५०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याच्या विचारात शिवसेना आहे.
"मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही का?" हे गीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाले आहे. यात रेडिओ जॉकी मलिष्काने मुंबईत पाणी तुंबतं, रेल्वे सेवा लेट होते, मुंबईत खड्डे पडतात आणि पावसात पालिकेची पोलखोल होते, असे सांगण्यात आले आहे. पहारेकरी आधीच दबा धरून बसले असताना हे गाणं म्हणजे भाजपाच्या हाती आयते कोलित देण्यासारखे आहे. त्यामुळे मलिष्कावर कारवाईची मागणी करीत प्रतिस्पर्धींचे तोंड बंद करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे.
त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले व समाधान सरवणकर यांनी आयुक्तांची आज त्यांच्या दालनात भेट घेतली. या गीतामुळे महापालिकेचेच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहराची प्रतिष्ठा मलिन केली आहे. मुंबईविषय चुकीचा संदेश पसरवणा-यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले याची दखल घेऊन आयुक्तांनी विधी खात्याकडे याविषयी मत मागितले आहे.