महापालिकेचे समाधान झाले नाही, राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराचे बांधकाम हटविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:28 AM2022-05-22T06:28:33+5:302022-05-22T06:29:12+5:30
राणा यांनी दिलेल्या उत्तरात बांधकामाप्रकरणी परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही
मुंबई : मुंबई महापालिकेने आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना त्यांच्या खार येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. राणा दाम्पत्याने सात दिवसांत अनधिकृत बांधकाम हटविले नाही तर महापालिकाच हे बांधकाम हटविणार असून, त्याची जबाबदारी राणा दाम्पत्याची राहणार आहे.
शिवसेनेला हनुमान चालिसा प्रकरणात दिलेल्या आव्हानानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले होते. त्याचवेळी मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याला त्यांच्या खार येथील घरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. दरम्यानच्या काळात राणा दाम्पत्य तुरुगांत असल्याने महापालिकेच्या पथकाला त्यांच्या घराची पाहणी करता आली नव्हती. त्यानंतर पालिकेच्या पथकाने घराची पाहणी करीत अनधिकृत बांधकामप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.
राणा दाम्पत्याने पालिकेच्या नोटिसीला उत्तर दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र पालिकेचे समाधान झालेले नाही. राणा यांनी दिलेल्या उत्तरात बांधकामाप्रकरणी परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही. पालिकेने राणा यांना आणखी एक नोटीस दिली आहे. त्या नोटिसीनुसार, राणा दाम्पत्याला सात दिवसांत अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी लागणार आहे. राणा यांनी तसे केले नाही तर पालिकाच ही कारवाई करणार असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी राणा यांची असणार आहे.