नाट्यगृहांशी निगडीत मुंबई महानगर पालिकेच्या संकेतस्थळाचे रंगकर्मींकडून स्वागत

By संजय घावरे | Published: February 3, 2024 03:54 PM2024-02-03T15:54:52+5:302024-02-03T15:55:12+5:30

नाट्यगृहांच्या मूलभूत कामांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही मत

Mumbai Municipal Corporation's website related to theaters is welcomed by theater workers | नाट्यगृहांशी निगडीत मुंबई महानगर पालिकेच्या संकेतस्थळाचे रंगकर्मींकडून स्वागत

नाट्यगृहांशी निगडीत मुंबई महानगर पालिकेच्या संकेतस्थळाचे रंगकर्मींकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहांमधील नाटकांच्या ऑनलाइन आरक्षणासाठी हेल्पलाईनसह संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्याची तरतूद मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. मनपाच्या या उपक्रमाचे स्वागत करतानाच नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर ठोस उपययोजना करण्याची गरज असल्याचे मत रंगकर्मींनी व्यक्त केले आहे.

मा. दिनानाथ नाट्यगृह,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर, महाकवी कालिदास नाट्य मंदिर आदी पालिकेच्या नाट्यगृहांमधील नाटकांची माहिती संकेतस्थळावर मिळणार आहे. मनपाचे हे पाऊल स्वागत करण्याजोगे असल्याचे सांगत अभिनेते डॅा. गिरीश ओक 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, मनपाचा हा प्रयत्न चांगला आहे, पण नाट्यगृहांसाठीही काहीतरी ठोस करायला हवे. नाट्यगृहांची स्वच्छता आणि देखभालीकडे लक्ष द्यायला हवे. नवीन नाट्यगृहे बांधताना रंगकर्मींचा सल्ला घेतला जात नसल्याने नाट्यगृह बांधल्यावर ते नाटकासाठी उपयुक्त नसल्याचे समजते. मीरा रोडमधील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह आणि भायखळ्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहांमधील रंगमंचाची खोली १५ आणि  १७ फूट असल्याने तिथे नाटक करणे सोयीचे नाही. या गोष्टी टाळण्यासाठी नाट्यगृह बांधण्यापूर्वी त्याचा प्लॅन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे यायला हवा. तिथल्या नेपथ्यकार रंगकर्मींना दाखवला जावा. त्यांचा सल्ला घ्यावा. नाट्यगृह बांधताना प्रेक्षकांचा विचार होतो, पण रंगकर्मींचा विचार केला जात नाही. ९० टक्के नाट्यगृहांची अॅकाॅस्टीक्स सदोष असल्याचे सांगत ओक यांनी सांस्कृतिक संचालनालयाचे याकडे लक्ष वेधले आहे.

पद्मभूषण प्रा. वामन केंद्रे म्हणाले की, महापालिकेचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. नाट्यगृहे कुठे आहेत, कोणत्या नाट्यगृहात कोणत्या नाटकाचे प्रयोग आहेत हे प्रेक्षकांना समजेल. न्यूयॅार्कमध्ये मी हे चित्र पाहिले आहे. एकाच ठिकाणी नाट्यगृहांची माहिती मिळणे फायदेशीर ठरेल. मुंबईबाहेरून येणाऱ्यांना अगोदरच तिकिट बुक करता येईल आणि एक प्रकारे थिएटर टुरिझमला चालना मिळेल. यासाठी कमिश्नर तसेच ही संकल्पना सादर करणाऱ्याचे अभिनंदन करायला हवे असेही केंद्रे म्हणाले.

अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव म्हणाले की, पालिकेच्या संकेतस्थळावर जर आठवड्याभरात कोणकोणती नाटके कोणत्या नाट्यगृहांमध्ये लागणार याची माहिती दिली जाणार असेल तर ते प्रेक्षकांसाठी सोयीचे ठरेल. आठवड्यापेक्षा जास्त दिवसांची माहिती देता कामा नये. कारण कलाकारांना काही अडचणी आल्या किंवा इतर काही समस्या उद्भवल्यास तारखा बदलाव्या लागतात. आठवड्यातील नाटकांची माहिती द्यायला हरकत नसल्याचेही जाधव म्हणाले.

Web Title: Mumbai Municipal Corporation's website related to theaters is welcomed by theater workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.