लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाचा फटका महापालिकेतील दिग्गज नेत्यांना बसला आहे. या दिग्गजांमध्ये माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, शिंदे गटाचे यशवंत जाधव, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे या दिग्गजांना आता अन्य प्रभागांचा शोध घ्यावा लागणार असून, त्यांचा तेथे कस लागणार आहे. तर नव्याने संधी मिळणारे उमेदवार महापालिका निवडणुकीत आपला ठसा कसा उमटविणार? याकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी घोषित झालेले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण वगळता २३६ पैकी २१९ प्रभागांची सोडत शुक्रवारी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंच सभागृहात काढण्यात आली. २१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसीसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी १५ (महिलांसाठी ८), अनुसूचित जमातीसाठी २ (महिलांसाठी १) जागा आहेत. शनिवारी काढण्यात आलेल्या सोडतीसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आले आणि नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.
नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात आली. यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गांसाठी ३१ मेच्या सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. आजच्या सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले.- विश्वास मोटे, सहायक आयुक्त
सोडतीत प्रभाग क्रमांकाची नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या उचलण्याची कार्यवाही ही एच पश्चिम विभागातील महापालिकेच्या लक्ष्मीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी केली.
एकूण २३६ जागांपैकी ११८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यापैकी ८ जागा अनुसूचित जाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती (महिला), ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी तर ७७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.
सर्वसाधारण प्रवर्ग एकूण जागा १५६
महिलांसाठी ७७ प्रभागप्रभाग क्रमांक २, ५, १०, २१, २२, २३, २५, २८, २९, ३३, ३४, ३९, ४५, ४६, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६४, ६७, ६९, ७४, ८०, ८६ , ९०, ९२, ९५, १००, १०३, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२०, १२१, १२२, १२५, १३१, १३४, १४२, १४४, १४५, १५१, १५६, १६३, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७७, १७८, १८१, १८२, १८४, १८६, १८७, १८९, १९१, १९२, १९६, २०१, २०५, २०७, २१२, २१३, २२०, २२५, २२६, २२७, २२९, २३१, २३३, २३४ सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण ७९ प्रभागप्रभाग क्रमांक १, ४, ६, ८, ११, १४, १५, १८, १९, २०, २४, २६, ३१, ३२, ३५, ३७, ४१, ४३, ४४, ४७, ५०, ५६, ५८, ६३, ६५, ६६, ६८, ७०, ७१, ७२, ७५, ७७, ७८, ८३, ८४, ८८, ९१, ९३, ९४, ९७, ९९, १०२, १०५, १०८, ११२, ११३, ११४, ११५, ११६, १२३, १२६, १३३, १३६, १३८, १४०, १४१, १४३, १४९, १५८, १६०, १६६, १६७, १७६, १९३, १९७, १९८, १९९, २०६, २०९, २१०, २११, २१४, २१६, २१९, २२४, २२८, २३२, २३५
माजी महापौर सुहास वाडकर यांचा वॉर्ड क्रमांक ४१ हा जनरल झाल्याने त्यांना पुन्हा येथे तिकीट मिळू शकते. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात नगरसेवक अनंत (बाळा) नर यांचा वॉर्ड ७९ हा ओबीसी महिला झाल्याने त्यांना आणि भाजपच्या नगरसेविका उज्वला मोडक यांचा वॉर्ड ७६ हा ओबीसी महिला झाल्याने या दोघांना फटका बसला आहे. नगरसेविका प्रीती सातम यांचा वॉर्ड ५४ हा महिलांसाठी खुला झाला आहे. तर, नगरसेवक प्रवीण शिंदे यांचा वॉर्ड ७५ हा खुला झाल्याने त्यांना परत नशीब आजमावता येणार आहे. वॉर्ड ५५ हा आदिवासी महिलासाठी राखीव झाल्याने येथे काँग्रेसतर्फे सुनिधी कुमरे प्रयत्नशील आहेत. वॉर्ड क्रमांक ७४ चे भाजप नगरसेवक पंकज यादव यांचा वॉर्ड क्रमांक महिलांसाठी खुला झाला आहे. माजी सभागृह नेते यशोधर फणसे, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) यांना नवा वॉर्ड शोधावा लागेल. शिवसेनेच्या महिला विभाग संघटक राजुल पटेल व नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यात तिकिटासाठी चुरस असेल. नगरसेवक योगीराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील यांना आता नवा वॉर्ड शोधावा लागेल. प्रभाग क्रमांक ५९ च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे यांचा आताचा वॉर्ड ६१ हा ओबीसी ओपन झाल्याने त्यांना परत नवा वॉर्ड मिळणे तसे कठीणच आहे. भाजप माजी नगरसेवक रोहन राठोड, सुधा सिंग, अल्पिता जाधव यांचे आरक्षण बदलले नसल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. माजी नगरसेविका मेहेर हैदर यांचा वॉर्ड ६८ हा जनरल झाल्याने त्यांचे पती व माजी नगरसेवक मोहसीन हैदर येथे निवडणूक लढवू शकतात. भाजपा माजी नगरसेविका रेणू हंसराज व माजी नगरसेवक अनिष मकवानी यांचे वॉर्ड आरक्षण बदलल्याने त्यांना नवा वॉर्ड शोधण्यासाठी कसरत करावी लागेल. माजी नगरसेवक हर्ष पटेल, संदीप पटेल, श्रीकला पिल्ले यांचे वॉर्ड बदलल्याने त्यांना नवे वॉर्ड शोधणे म्हणजे कसरत आहे.