मुंबई : शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स व पब्जना दिलेला परवाना, अग्निसुरक्षेच्या सोयी व अन्य महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांना आॅनलाइन अथवा मोबाइल अॅपद्वारे देण्याची सोय करा, अशी महत्त्वाची सूचना उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गुरुवारी केली.गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कम्पाउंडला लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. याची न्यायालयीन आयोगाद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या सुनावणीत मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांनी वरील सूचना पालिकेला केली.त्यांची विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने काही महिन्यांपूर्वी अहवाल सादर करून त्यात काही शिफारशी केल्या. परवाना आणि अग्निसुरक्षेसंदर्भात पालिकेने काही पोटकायदे करावे, अशी शिफारस समितीने अहवालात केली होती. त्यानुसार, गुरुवारच्या सुनावणीत महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी महापालिका यासंदर्भात पोटकायदे करण्याच्या विचाराधीन असल्याचे न्यायालयाला सांगितले.त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेला नागरिकांना जागरूक करण्यासाठी आॅनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याची सूचना केली. ‘सर्वसामान्यांसाठी आॅनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करा. त्यांना हे सहज उपलब्ध होते. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि पब यांना दिलेल्या परवानग्या, अग्निसुरक्षेसाठीची खबरदारी व अन्य सुविधांची माहिती आॅनलाइन किंवा मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध करा,’ असे न्यायालयाने म्हटले. यावरील सुनावणी ७ जानेवारीला आहे.महापालिकेने मोबाइल अॅप विकसित करावे‘कोणते हॉटेल, रेस्टॉरंट चांगले आहे? किती रेटिंग आहे आणि येथील खाद्यपदार्थ चांगले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी मोबाइल अॅप आहे. याच धर्तीवर महापालिकेनेही एखादे मोबाइल अॅप विकसित करावे,’ अशी सूचना न्यायालयाने महापालिकेला केली.
हॉटेल, रेस्टॉरंट्स, पब्सची माहिती मोबाइल अॅपद्वारे देण्याची मुंबई पालिकेला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:49 AM