मुंबई पालिकेत राजीनामा नाट्य, सेनेतील वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:02 AM2018-02-16T02:02:31+5:302018-02-16T02:02:44+5:30
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपात कामाचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच, आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांनी गुरुवारी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपात कामाचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच, आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांनी गुरुवारी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महापौर पदासह स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सेनेमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झाले होते. त्या वेळी मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांना डावलून महापौरपद विश्वनाथ महाडेश्वर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद रमेश कोरगावकर यांना देण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे, सभागृह नेतेपदीही यशवंत जाधव यांना बसविण्यात आले होते. या घडामोडींदरम्यान सातमकर आणि चेंबूरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मनसेतून आलेल्यांना मिळणार संधी?
मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर या दोघांनाही पालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर मनसेमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, मनसेतून सेनेत दाखल झालेल्यांना पदे मिळत असल्याने शिवसैनिकांची नाराजी आहे. घाटकोपरमध्येही यावरून दोन दिवसांपूर्वीच वाद निर्माण झाला होता.