पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 11:49 AM2023-04-06T11:49:31+5:302023-04-06T11:49:50+5:30
प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर संकट कायम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकीकडे कोविड आणि इन्फ्ल्यूएंजाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिका रुग्णालयातील औषधांचा साठा बंद करणार असल्याचा इशारा मुंबईतील पुरवठादारांनी दिला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनासह बुधवारी झालेल्या बैठकीत औषध खरेदी आणि पुरवठा प्रक्रियेत तोडगा निघाला नसल्याचे पुरवठादारांनी सांगितले, तर दुसरीकडे या प्रक्रियेत पालिका प्रशासनाला पुरवठादारांना वगळायचे असल्याचा आरोपही पुरवठादारांच्या संघटनेने केला आहे.
पालिका प्रशासनाने २०२२ मध्ये काढलेल्या निविदा प्रक्रियेतील क्लिष्ट अटींचा आधार घेत पुरवठादारांना या प्रक्रियेतून वगळण्यात येत आहे. मागील वर्षांची ही निविदा नव्या वर्षांत मंजूर करण्यात आली, त्यानंतर निविदांमधील अटींप्रमाणे यात औषध उत्पादक थेट औषधांचा पुरवठा करतील असे म्हटले आहे. यासंबंधी देयकांबद्दल पुरवठादारांऐवजी उत्पादक कंपन्यांशी व्यवहार करण्यात येईल असा उल्लेख आहे; मात्र प्रशासनाला गेली अनेक वर्षे चालत आलेल्या औषध पुरवठ्याच्या प्रक्रियेत बदल करायचा असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.
बैठकीविषयी पांडे यांनी सांगितले की, रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये औषधांचा साठा मर्यादित असल्याचे भासवून स्थानिक औषध खरेदीला वाव देण्याकडे प्रशासनाचा कल आहे. पुरवठादारांकडून औषध घेणे थांबवून स्थानिक औषध खरेदीच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
देयके रखडणार
पालिका प्रशासन या निर्णयावर ठाम राहिल्यास औषध पुरवठादारांकडून देयके देण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. परिणामी यामुळे सध्या पुरविण्यात येणाऱ्या औषधांसह वैद्यकीय साहित्यांची देयके रखडण्याची भीती पुरवठादारांमध्ये आहे.
पुरवठादारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत; मात्र औषध खरेदी व पुरवठ्याविषयी मार्ग काढून निर्णय घेण्यात येईल, या प्रक्रियेत सामान्यांना औषध उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल. -संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त, पालिका प्रशासन