Join us  

पालिकेकडे स्वच्छतेसाठी ३४० वाहनांचा ताफा 

By सीमा महांगडे | Published: January 01, 2024 1:04 PM

३४० वाहनांचे प्रात्यक्षिक व पथसंचलन पालिकेकडून सादर

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदा असा संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल, त्यातून स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. महानगरपालिकेच्या रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानात ते सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी सुमारे ३४० वाहनांचे पथसंचलन करण्यात आले. राज्य शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याने, राज्‍यभरातील जिल्‍हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांसह सर्वच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना स्‍वच्‍छता कार्यपद्धतीचे प्रात्‍यक्षिक सादर करता यावे यादृष्टीने महानगरपालिकेकडून हे संचलन आयोजित करण्यात आले होते. 

महानगरपालिकेच्या घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागात कार्यरत असलेल्या यंत्रसामुग्रीची तसेच इतर वाहनांची क्षमता देखील सर्वांना ठाऊक व्हावी,  या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्‍या संकल्पनेतून ३४० वाहनांचे दिमाखदार पथ संचलन करण्यात आले. त्‍यात पायलट जीप १,  जेसीबी ६, मोठे कॉम्पॅक्टर १०, लहान कॉम्पॅक्टर २५, डंपर १२, एअर वॅक २, स्लज डिवॉटरींग २, घनकचरा वाहने ७, अतिक्रमण निर्मूलन १२, ट्रक १२, कचरा संकलन व वहन वाहन ५, फायरेक्स २, पाणी टँकर १, ब्रेकडाऊन वाहने ३, व्रेकर १, वृक्ष छाटणी वाहन १, ट्रॅक्टर २, श्वान वाहक वाहन १, भटकी जनावरे पकडणारी वाहने १, बस २, एक्यूएमआरएल १, रुग्णवाहिका ५, शववाहिका १, रक्तपेढीची वाहन १, दंतचिकित्सा वाहन १, बोलेरो वाहन १, इतर २१ यासोबत स्वच्छता विभागासाठी कार्यरत सेवा पुरवठादाराची २०० वाहने अशा एकूण ३४० वाहनांचा यामध्ये समावेश होता. गेट वे ऑफ इंडिया येथून पथ संचलनाची सुरुवात झाली. तर, आर दक्षिण विभागातील ठाकूर गाव येथील  हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क येथे संचलनाची सांगता करण्यात आली.

दहा ठिकाणी महास्वच्छता अभियान 

महानगरपालिकेतर्फे रविवारी मुंबईत दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान राबवण्यात आले. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा; सदाकांत ढवन मैदान, नायगाव; वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम; वेसावे (वर्सोवा) चौपाटी; गणेश घाट, गोरेगाव पूर्व; स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण, कुर्ला पूर्व; अमरनाथ पाटील उद्यान, गोवंडी पूर्व; हिरानंदानी संकूल, पवई; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव, कांदिवली पूर्व अशा एकूण दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान पार पडले.  या महा स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यक्रम भारताचे प्रवेशद्वार येथे पार पडला आणि येथूनच उर्वरित नऊ ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका