मुंबई मनपा ‘आर’ दक्षिण विभाग’; संमिश्र लोकवस्तीचा वॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:15 AM2023-12-30T10:15:26+5:302023-12-30T10:16:28+5:30
समुद्रकिनारे किंवा मोठी उद्याने, नावाजलेली प्रसिद्ध ठिकाणे नसली तरी मोठ्या संमिश्र लोकवस्तीचा भाग म्हणून ‘आर’ दक्षिण विभाग ओळखला जातो.
कोणतेही समुद्रकिनारे किंवा मोठी उद्याने, नावाजलेली प्रसिद्ध ठिकाणे नसली तरी मोठ्या संमिश्र लोकवस्तीचा भाग म्हणून ‘आर’ दक्षिण विभाग ओळखला जातो. पोइसरमधील चर्च व परिसरातील ख्रिश्चन वस्तीही या विभागात आहे. त्यामुळे कांदिवली पूर्व आणि पश्चिमेतील भागांचा समावेश असणाऱ्या ‘आर’ दक्षिण विभागात उच्चभ्रू ते झोपडपट्टी परिसराचा समावेश होतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारी पोयसर नदी कांदिवली पश्चिमेकडून मालाडकडे जात खाडीला मिळते. या नदीच्या दोन्ही काठांवरच्या परिसराने ‘आर’ दक्षिण विभागाचा भाग व्यापला आहे. अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, फेरीवाल्यांचा बाजार, पार्किंगचा पेच ही विभागासमोरील काही आव्हाने आहेत.
हद्द-पूर्व-पश्चिम :
पूर्व : दामूनगर, संजय गांधी नॅशनल पार्क
पश्चिम : चारकोप खाडी
दक्षिण : टाइम्स ऑफ इंडिया, पोयसर नदी, लालजीपाडा
उत्तर : ९० डीपी रोड, पोयसर जिमखाना रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स
वॉर्डाचे वैशिष्ट्य :
उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, टाइम्स ऑफ इंडिया प्रेसजवळील दरडप्रवण भागाचे सुशोभीकरण करून तिथे सिंहगडाची आणि मावळ्यांची प्रतिकृती उभारण्यात आली असून, हा स्पॉट सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
पोयसर नदीला येणाऱ्या पुराच्या समस्येवर पालिकेकडून सुरक्षा भिंतीचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण केल्यामुळे मागील वर्षी येथेही समस्या नागरिकांना जाणवली नाही.
झोपडपट्टीतील मलनिस्सारण टाक्यांची जोडणी मुख्य वाहिन्यांना जोडल्याने या भागात स्वच्छतागृहांची समस्या कमी होत आहे. ‘आर’ दक्षिण विभागात असणाऱ्या बंदरपाखाडी, डिंगेश्वर तलाव आणि कांदिवली गावठाण अशा ३ तलावांचे सुशोभीकरण पालिकेकडून हाती घेण्यात आले असून येत्या काळात स्थानिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :
प्रियांका मोरे : वॉर्ड क्र. २२
शिवकुमार झा : वॉर्ड क्र. २३
सुनीता यादव : वॉर्ड क्र. २४
माधुरी भोईर : वॉर्ड क्र. २५
प्रीतम पांडागळे : वॉर्ड क्र. २६
सुरेखा पाटील : वॉर्ड क्र. २७
शंकर (एकनाथ) हुंडारे : वॉर्ड क्र. २८
सागर सिंग ठाकूर : वॉर्ड क्र. २९
लीना देहरेकर : वॉर्ड क्र. ३०
कमलेश यादव : वॉर्ड क्र. ३१
ललित तळेकर, सहायक आयुक्त :
फेरीवाल्यांच्या आणि कचऱ्याच्या समस्येवर आम्ही लक्ष केंद्रित आहोत आणि त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. शिवाय संपूर्ण स्वच्छता मोहिमेत द्रुतगती मार्गासह छोट्याअंतर्गत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. गोरेगाव ते मागाठाणे दरम्यान रस्ता रुंदीकरणही आम्ही करीत असून, यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. त्या भागातील अनधिकृत झोपड्या निष्कासित करण्याच्या प्रस्तावावर ही कामे सुरू आहेत.
शैक्षणिक संस्था : श्री एकविरा विद्यालय, पी. जे. पंचोलिया हायस्कूल, ऑक्सफोर्ड पब्लिक स्कुल, पवार हायस्कूल, चारकोप महापलिका शाळा
रुग्णालये : ०५ डिस्पेन्सरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (पश्चिम)'
मुख्य समस्या :
कांदिवली पूर्व आणि पश्चिमेस फेरीवाल्यांची अतिक्रमणे, पश्चिम द्रुतगती महामार्गाप्रमाणेच जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडीसारखे प्रश्न जाणवतात.
जागांच्या कमतरतेमुळे वाहनांच्या पार्किंगची अडचण येते. त्यामुळे कोंडीत भर पडते. हनुमाननगर, वडारपाडा ते पश्चिमेतील अनेक भागांत पाण्याची कमी दाबाची समस्या आहे.
या भागात पाणीपुरवठा होणाऱ्या मालाड जलाशयाच्या जलवाहिनीच्या तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या जाणवते. बैठ्या गृहसंकुलांना जोडणारे रस्ते अगदीच अरुंद व त्याकडे दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात. त्यामुळे पार्किंगची समस्या मोठी आहे.