मुंबई महापालिकाही करणार प्रदूषणाशी दोन हात; प्रदूषणाचा स्तर मोजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:16 AM2020-02-12T00:16:42+5:302020-02-12T09:54:27+5:30
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सफर या दोन संस्था मुंबईमधील प्रदूषणाचा स्तर मोजत असतानाच आता मुंबई महापालिकाही ...
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सफर या दोन संस्था मुंबईमधील प्रदूषणाचा स्तर मोजत असतानाच आता मुंबई महापालिकाही येथील प्रदूषणाचा स्तर मोजणार आहे. त्यानुसार मुंबईत १० ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग मशीन बसविल्या जाणार आहेत. प्रभादेवी, खार, साकीनाका, कांदिवली, देवनारसह उर्वरित सहा ठिकाणांचा यात समावेश आहे.
मुंबईतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. केंद्र सरकार या निधीसाठी महापालिकेला मदत करत आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत हे काम सुरू करण्यात येत आहे. मुंबई महापालिका करत असलेल्या कामांचे मूल्यांकन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाईल. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम केले जाईल. यासाठी एक प्लानही तयार करण्यात येत आहे. केंद्राकडून मिळणारी रक्कम प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक घटकांवर खर्च केली जाईल. शिवाय जनजागृतीसह वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी याचा वापर केला जाईल.
देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर २०१९ साली मोदी सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, प्रदूषणाचा स्तर अधिक असलेल्या १०० शहरांमध्ये काम करण्यात येईल. येथील प्रदूषणाचे प्रमाण ५ वर्षांत २० ते ३० टक्क्यांनी करण्याचे उद्दिष्ट आहे.
1गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगराचे वातावरण खराब नोंदविण्यात येत आहे. मंगळवारीदेखील वांद्रे-कुर्ला संकुल आणि नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता खराब नोंदविण्यात आली आहे.
2ग्रीनपीसच्या अहवालानुसार, प्रदूषित शहरांच्या यादीत भारत ३७ व्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षांत प्रदूषणांच्या प्रकरणांत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
3प्रदूषण आणि कृती कार्यक्रम यावर चर्चेसाठी आपला वेळ क्लीन एअर कलेक्टिव्हला द्यावा, असे निवेदन वातावरण फाउंडेशनने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले आहे.