एलबीएस रोडवर ३२ कोटींचा स्कायवॉक; नागरिकांची होणार वाहतूककोंडीतून सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:22 AM2024-01-25T10:22:12+5:302024-01-25T10:22:57+5:30

पालिकेकडून आता एलबीएस रोडवर स्कायवॉक बांधण्यात येत आहे.

Mumbai municipality will construct a 32 crore skywalk on LBS road | एलबीएस रोडवर ३२ कोटींचा स्कायवॉक; नागरिकांची होणार वाहतूककोंडीतून सुटका 

एलबीएस रोडवर ३२ कोटींचा स्कायवॉक; नागरिकांची होणार वाहतूककोंडीतून सुटका 

मुंबई :  मुंबईच्या पूर्व उपनगरातील ‘टी’ विभागातील एलबीएस रोड, एसीसी शीमेट कंपनी रोड, दीनदयाळ उपाध्याय रोड व शांताराम चव्हाण रोड यांच्या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी होत असते. तसेच, काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पर्यायी व्यवस्था किंवा मार्ग बनविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून आता एलबीएस रोडवर स्कायवॉक बांधण्यात येत आहे. यासाठी अंदाजे ३२ कोटींचा खर्च येणार आहे. हा स्कायवॉक बेस्ट बस डेपो आणि प्रस्तावित मेट्रो स्टेशनशी जोडला जाणार असल्याने या भागातील पुढील अखंड कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कोंडी यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. 

सद्य:स्थितीत एलबीएस रोडच्या जंक्शन जवळच महापालिकेची शाळा व बेस्ट बस डेपो असल्याने पादचाऱ्यांची रहदारीही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पादचाऱ्यांना हे जंक्शन ओलांडणे जिकरीचे झाले आहे. या आधी पालिकेकडून पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता भुयारी मार्गासाठी २०१६ ते २०१९ या काळात तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली होती. यांच्याकडून प्रस्तावित पादचारी भुयारी मार्गाचे आराखडे, नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक व मसुदा निविदा बनविण्यासाठी ही निवड केली होती. 

मात्र  जलअभियंता विभागाकडून प्राप्त अहवालानुसार या चौकात भूमिगत जलवाहिन्या असल्याचे समजल्यामुळे भुयारी मार्गाचा पर्याय वगळून आकाश मार्गिका (स्काय वॉक) बांधण्याचा पर्याय निश्चित करण्यात आला. शिवाय या चौकात प्रस्तावित मेट्रो लाइन-४च्या सुपर-स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रस्तावित पादचारी पूल बांधावा, असे मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कळविण्यात आले होते.  

स्कायवॉकची खास वैशिष्ट्ये :

 एकूण लांबी ४५१.१६ मीटर असेल
 पुलाची रुंदी ३ मीटर असेल
 पाइल फाउंडेशन पद्धत वापरली जाईल
 १२५ मिमी काँक्रीट डेक स्लॅब स्टील कंपोझिट प्लेट गर्डर बसवले 
जातील.
 आधुनिक एस्केलेटर बसवण्यात येणार आहेत
 पायऱ्यांवर ॲण्टी-स्किप टाइल्स स्लॅब

२४ महिन्यात काम पूर्ण होणार :

या स्कायवॉकचे काम कंत्राटदाराला काम दिल्यापासून १५ दिवसांच्या आत सुरू करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पावसाळा धरून पुढील २४ महिन्यांत हे काम संबंधित कंत्राटदाराला पूर्ण करावे लागणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी त्याचा आराखडा, नियोजन, संकल्पचित्र, अंदाजपत्रक तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागाराला पालिकेकडून ४५ लाख शुल्क मंजूर करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai municipality will construct a 32 crore skywalk on LBS road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.