मुंबई-नवी मुंबई मेट्रोने जोडणार
By admin | Published: May 22, 2017 03:48 AM2017-05-22T03:48:15+5:302017-05-22T03:48:15+5:30
नवी मुंबई मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होईल. एकूण १०६ किमीचे मेट्रोचे जाळे नवी मुंबईत उभारले जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नवी मुंबई मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होईल. एकूण १०६ किमीचे मेट्रोचे जाळे नवी मुंबईत उभारले जाणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई नवी मुंबईशी जोडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे दिली.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी २४ मे रोजी मतदान होत असून भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन सहा महिने झाले आहेत. मात्र आतापर्यंत २८० कोटी रु पयांचा निधी पनवेलसाठी मंजूर केला आहे. येत्या काळात सिडकोच्या माध्यमातून पनवेलचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल महापलिका क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले जात आहे. त्यामुळे या शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. त्यामुळे शहरांचा विकास होणे गरजेचे असून २०१९ पर्यंत महापालिका क्षेत्रातील एकही रहिवासी बेघर राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पनवेलकरांना मंत्रीपदाचे आमिष
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही मला एक भेट द्या, मी तुम्हाला दुसरी भेट देतो, असे आवाहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवले. स्मार्ट सिटी म्हणून पनवेलचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी बांठीया स्कूलच्या मैदानावरील प्रचारसभेत केले.
उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
तळोजा : गुंडांना पक्षात घेऊन भाजपाने वाल्याचा वाल्मीकी केला आहे. पनवेल परिसरात होऊ घातलेल्या नवीन प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या न दिल्यास शिवसेना या प्रकल्पांना विरोध करणारच, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला.