मुंबई, नवी मुंबई जलवाहतुकीद्वारे रायगडशी ‘रो-रो’द्वारे जोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:26 AM2019-01-29T04:26:35+5:302019-01-29T04:27:06+5:30
सागरमालाअंतर्गत २०३ कोटींचा आराखडा; तीन ठिकाणी जलपर्र्यटन जेट्टी
- नारायण जाधव
ठाणे : सध्या मुंबई ते उरण किंवा नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर रस्तामार्गे कापण्यासाठी प्रवाशांचा मोठा वेळ तर जातोच, शिवाय वाहनांचे वाढते प्रदूषण, वाढत्या अपघातांनाही तोंड द्यावे लागते. यामुळे ही दोन्ही शहरे रायगड जिल्ह्याला सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतूकमार्गे जोडून त्यातून ‘रो रो सेवा’ सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या दुचाकींसह चारचाकी मोटारी बोटीतून उरण, रेवससह काशीद बीचवर नेणे सोपे होणार आहे.
यासाठी उरणचे करंजा बंदर, अलिबागचे रेवस बंदर आणि मुरुड नजीकच्या काशीद बीच येथे जलपर्यटन वाढीस लागावे, यासाठी रो रो सेवा सुरू करण्यासाठी विशेष अशा जेट्टी बांधण्यात येणार असून, या तिन्ही कामांवर सुमारे २०३ कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात सागरमालाअंतर्गत केंद्राकडून ५० टक्के अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या तिन्ही जलपर्यटन जेट्टी, पार्किंग, टर्मिलन बिल्डिंगसह तत्सम बांधकामे पूर्ण झाल्यावर, मुंबईसह नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याचे अंतर कमी होऊन पर्यटनवाढीस मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ, इंधनात बचत होऊन प्रदूषण, आणि अपघातांचे प्रमाण कमी होऊन संभाव्य अपघातात दरवर्षी जाणारे शेकडो प्रवाशांचे जीव वाचतील, असा आशावाद शासनाने व्यक्त केला आहे.
रेवस येथेही जेट्टी होणार
नवी मुंबई ते अलिबाग ही शहरे जलवाहतूकमार्गे जोडण्याच्या दृष्टिकोनातून उरण तालुक्यातील करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस अशी रो रो सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. सध्या रेवस ते करंजा हे रस्तामार्गे अंतर ८६ किमी असून, जलवाहतूकमार्गे अवघे ३ किमी आहे. यामुळे दोन्ही बंदरांमार्गे जलवातुकीद्वारे रो रो सेवा सुरू केल्यास, रस्ता वाहतुकीवरील ताण मोठ्या प्र्रमाणात कमी होऊन इंधन, वेळेची बचत होऊन राष्ट्रीय नुकसान टळणार आहे.
काशीद येथे जलपर्यटन
मुरुड-जंजिरा नजीकच्या निसर्गरम्य काशीद येथे साडेतीन किमीचे विस्तीर्ण बीच आहे. मात्र, या ठिकाणी पर्यटकांसाठी कोणत्याही सेवासुविधा नाहीत. यामुळे त्यांना संख्या अडचणींना तोंड द्यावे लागते. येथून मुरुड शहर पाच किमी अंतरावर असून, पर्र्यटक आपली वाहने बीच लगतच्या रस्त्यावर उभी करतात. त्यांचा हा त्रास वाचण्यासाठी काशीद येथे जलपर्यटन जेट्टी, पार्किंग प्लाझासह इतर तत्सव सुविधा उभारण्यासाठी ११२ कोटी ४६ लाख रुपयांच्या आराखड्यात मान्यता देण्यात आली आहे.
मोरा जेट्टीवर ६५.३९ कोटींचा खर्च
उरण ते मुंबई हे रस्तामार्गे अंतर ७० किमी आहे. त्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो, तर जलवाहतूकमार्गे हे अंतर ५.३० नॉटिकल माइल असून, त्यास अर्धा लागतो. सध्या मुंबईतील भाऊचा धक्का ते उरण नजीकचे मोरा बंदर अशी बारमाही जलवाहतूक सेवा सुरू आहे, परंतु प्रवाशांना बोटीतून आपली वाहने नेता येत नाहीत. यासाठी मोरा येथे ६५.३० कोटी खर्चून रो रो जेट्टीसह फलाट, बोटींचे धक्के आणि तत्सम कामे करण्यात येणार आहेत.