मुंबईतील NCP च्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; आतापर्यंत ५० नगरसेवक शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 07:47 AM2023-12-23T07:47:35+5:302023-12-23T07:48:33+5:30

मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असून ही संख्या दिवसागणिक वाढत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai NCP leader harun khan joins Shiv Sena; So far 50 corporators in eknath Shinde group | मुंबईतील NCP च्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; आतापर्यंत ५० नगरसेवक शिंदे गटात

मुंबईतील NCP च्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; आतापर्यंत ५० नगरसेवक शिंदे गटात

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुन खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या किसन नगर २ येथील शाखेत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टोला लगावला. आतापर्यंत विविध पक्षाच्या ५० नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.  

पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, हारून खान यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लीम नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या ५० नगरसेवकांच्या वर गेली आहे. मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असून ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबतच पावसाळ्यातही आपण जातीने भेट देऊन नालेसफाईची पाहणी केली त्यामुळे यंदा रस्त्यावर पाणी सचल्याचा फारशा तक्रारी आल्या नाहीत. हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत.आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत असून त्यामुळे शहर अधिक सुंदर होत आहे. यापूर्वी कधीही मुंबईतील रस्ते धुतलेले कुणी पाहिले होते का..? मात्र आज ते स्वच्छ करून मग धुतले जात आहेत. रस्त्यावर फारसे खड्डे देखील दिसले नाहीत हे सारे करायचे तर प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते घरात बसून हे साध्य होत नाही असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, विक्रोळी पार्क साईट परिसरातील रुग्णालयाची प्रलंबित मागणी असो किंवा या भागातील रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीने गती देऊन पूर्ण केले जातील. मुंबईतील अशा रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी MMRDA, म्हाडा, सिडको अशा सर्व यंत्रणांना एकत्रित करून या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगत मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमावेळी खान यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mumbai NCP leader harun khan joins Shiv Sena; So far 50 corporators in eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.