Mumbai: आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक
By मनीषा म्हात्रे | Published: July 18, 2023 03:01 PM2023-07-18T15:01:29+5:302023-07-18T15:02:15+5:30
Mumbai : फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता गुरुज्योतसिंह तरलोचन किर सिंह (२८) याला अटक करण्यात आली आहे. भाजपचे पदाधिकारी मनीष तिवारी यांच्या तक्रारीनुसार, १७ जुलैच्या सकाळी ते भाजपाच्या मुलुंड तालुका विभाग कार्यालयात असताना फेसबुकवर त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या मुलुंडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर एक व्हिडोओ पोस्ट केलेला दिसला.
त्यामध्ये, एका मराठी न्यूज चॅनलला दिलेल्या बाईटचा समावेश होता. त्या व्हिडीओला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने एक मथळा होता. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांने नरेंद्र मोदी यांच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे दिसून आले. त्यानुसार, त्यांनी पोलिसांत धाव घेत, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल द्वेष भावना निर्माण होऊन त्यांची व भाजपाची जनमानसात असलेली प्रतिमा मलिन करणारा व्हिडीओ प्रसारित केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवत पोलिसांनी अटकेची कारवाई केली.