मुंबई - विवाह संकेतस्थळावरून २५ लाखांची फसवणूक झालेल्या तरुणीच्या व्यथेला ‘लोकमत’ने वाचा फोडली. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिसांकडून कार्यवाहीचा अहवाल मागवला आणि अखेर दोन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पडले. शनिवारी रात्री संपत कुमार या तरुणाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.चारकोप परिसरात राहणारी रेश्मा (नावात बदल) उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करते. विवाह संकेतस्थळावरून ओळख झालेल्या संपत कुमारने २०१६मध्ये लग्नाचे आमिष दाखवून चार महिन्यांत तिच्याकडून २५ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला धक्का बसला. या अनपेक्षित धक्क्यामुळे ती काही दिवस ट्रॉमामध्ये होती. त्यातून सावरून तिने पोलीस ठाणे गाठले, तेव्हा तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी, ‘तू खरंच नशीबवान आहेस. आरोपीने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत, बलात्कार झाला नाही, फक्त पैसेच गेले आहेत ना. त्यामुळे त्याला विसर आता आणि आयुष्यात पुढे हो.’ अशा दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ती आणखीन खचली. तर तपास अधिकारी पीएसआय तोंडेला ती रोज कॉल करते, तेव्हा त्यांच्याकडून फक्त ‘सॉरी आयएम बिझी नाऊ’चा संदेश धाडण्यात येत आहे. दोन वर्षे उलटूनही गुन्हा दाखल करण्यास मुहूर्त सापडत नसल्याने तिने ३१ मे रोजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार दिली. याबाबत ६ जूनच्या अंकातून ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र शुक्रवारी चारकोप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना धाडण्यात आले.शनिवार, ९ जूनला सकाळीच चारकोप पोलीस तरुणीच्या घरी धडकले. तिला पोलीस ठाण्यास हजर राहण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी तरुणीशी संपर्क साधला. शनिवारी रात्रीच तरुणीच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी संपत कुमार आणि त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजब सल्ले देणाऱ्या पोलिसांवरही कारवाई होणारा का? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.अधिक तपास सुरूतरुणीच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिली.आणखी बळी नकोमाझ्या सारख्या आणखीन किती तरुणी या टोळीच्या जाळ्यात अडकल्या असतील, माहिती नाही. त्यामुळे किमान पोलिसांनी आता तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचा वेग वाढवावा आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, असे रेश्माने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अखेर दोन वर्षांनी गुन्हा दाखल, चारकोप फसवणूक प्रकरणी महिला आयोगाने मागवला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 6:17 AM