आठ कोटींची ‘फेअर प्ले’ची मालमत्ता जप्त, लोकसभा निवडणुकीत केले होते बेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:33 PM2024-06-14T12:33:31+5:302024-06-14T12:33:40+5:30
Mumbai News: नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात तसेच आयपीएल आणि अन्य क्रिकेटच्या सामन्यात ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले ॲप कंपनीला ईडीने दणका देत कंपनीची बँकेतील रक्कम, डिमॅटमधील शेअर्स, आलिशान घड्याळे आणि रोख रक्कम अशी एकूण आठ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबई - नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात तसेच आयपीएल आणि अन्य क्रिकेटच्या सामन्यात ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले ॲप कंपनीला ईडीने दणका देत कंपनीची बँकेतील रक्कम, डिमॅटमधील शेअर्स, आलिशान घड्याळे आणि रोख रक्कम अशी एकूण आठ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या वेबसाइटवरून आयपीएल तसेच क्रिकेट सामन्यांचे प्रेक्षपणही सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, क्रिकेट सामन्याच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या व्हायकॉम-१८ या कंपनीने फेअर प्लेच्या वेबसाइटवरून अवैधरीत्या क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे केली होती. तसेच, यामुळे त्यांच्या १०० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे देखील नमूद केले. त्यानंतर या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात कंपनीने दुबई व अन्य देशांत पैशांचे व्यवहार केल्याचे दिसून आले. या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला होता. त्यामध्ये सुमारे ४०० बँक खात्यांतून विविध देशांत पैशांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई व पुणे येथे १९ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तसेच डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत.