Cosatal Road : मुंबईच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोड प्रकल्पावरुन सध्या मोठा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे, कोस्टल रोडच्या विलंबाचा तपास आमचं सरकार आल्यावर करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का? असा सवाल भाजप आमदार शेलार यांनी केला आहे.
कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. काम पूर्ण झालेलं नसतानाही कोस्टल रोडचे उद्धघाटन करण्यात आल्याचे विरोधकांनी म्हटलं. तर कोस्टल रोडच्या विलंबाचा तपास आमचं सरकार आल्यावर करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला. यावरुन आता भाजपने आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना कोस्टल रोडच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. "आदित्य ठाकरे कुठून बोलत आहेत? कुठल्या जागेवरून बोलत आहेत? ते लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का? सुट्टीवर येणाऱ्या अधिकऱ्यांसारखे काम आदित्य यांचे आहे. उंटावरून शेळ्या आदित्य यांनी हाकु नयेत. मुंबई महापालिकेला सडेतोड उत्तर द्यावे लागतील. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी कोस्टल रोडची कामे महापालिकाकडे घेतली. उद्धव ठाकरेंनी आदित्य यांच्या हट्टामुळे हे केले. मी त्यावेळी प्रश्न मांडले, विधानसभेत बोललो. या कामात महापालिकेने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले होते का? त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आपल्याच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उप कंत्राटदार म्हणून कामे देण्यात आली होती. त्यामुळे ती दुय्यम दर्जाची झाली. कामांना विलंब झाला. भ्रष्टाचार झाला. महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यांच्यावर दबाव होता का?," असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केला.
कोस्टल रोडची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
"कोस्टलच्या टनेलमध्ये होणाऱ्या गळतीबाबत मी माहिती घेतली. मनपा आयुक्तांशी बोललो. टनेलच्या ग्राऊटींगमध्ये काही लिकेज आहेत. मुख्य बांधकामात कोणतीही गळती नाही. मूळ संरचनेला कोणताही धोका नाही. तिथे मनपा अधिकारी अमित सैनी, एलएनटीची टीम देखील पाहणीला गेली होती. आताही सर्व तज्ज्ञ मंडळी तिथं आहेत. जी काही दुरुस्ती करायची आहे ती कायमस्वरुपी असली पाहिजे. तात्पुरती असता कामा नये असे आदेश मी दिले आहेत", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.