Join us

"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:54 AM

Mumbai News : मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

MNS Avinash Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह आणखी दोघांविरोधात दोन दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांत खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर अविनाश जाधव यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता याप्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अविनाश जाधव यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिलीय. याबाबत त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

मनसे नेते अविनाश जाधव यांचे सराफाच्या मारहाणी प्रकरणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये अविनाश जाधव सराफाच्या मुलाला मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी अविनाश जाधव आणि त्यांच्या विरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशाोबासाठी सराफाने बोलावलं असताना मनसे नेत्याने सराफाच्या मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी सराफ जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. दरम्यान आता याप्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने अविनाश जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पोलिसांसमोर खंडणी मागू शकतो का?

"मला वैभव नावाच्या एका मुलाचा फोन आला होता. त्याने मला असं सांगितलं की मला आणि माझ्या बायकोला कोंडून ठेवण्यात आलंय. मी हुत्मामा चौकात होतो. त्यांना पोलिसांना फोन करायला सांगितलं. माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघ यांना फोन करुन सगळी घटना सांगितली. त्यावेळी तिथे गेल्यावर खाली लॉक लावल्याचे पाहिले. पोलिसांनी दम देऊन लॉक उघडायला लावला. आतून बंद केलेली मुलगी ओरडत होती. हे लोक पोलिसांना सांगत होते की मनसेवाल्यांना आत घेणार नाही. मी त्यांना मुलीला बाहेर काढण्यास सांगितले. तिला बाहेर काढण्यासाठी मी त्याच्या कानाखाली मारली. यात माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होण्यासारखं काय आहे? मी मुलीच्या मदतीसाठी गेल्यावर पोलिसांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. माझं उद्दिष्ट चांगलं होतं. एका मुलीला बंद करुन ठेवलं तर मी काय डोळे बंद करुन बसायचं का? एका माणसाने अडीच तास एका महिलेला बंद करुन ठेवलं होतं. पोलिसांच्या आधी मी पोहोचलो होतो. असं असेल तर मी काय हातावर हात ठेवून बसायचं का? पोलिसांसमोर खंडणी मागू शकतो का?," असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमनसेअविनाश जाधवमुंबई पोलीस