वादळी पावसामुळे मच्छीमार हैराण, शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी
By धीरज परब | Published: September 15, 2022 08:46 PM2022-09-15T20:46:42+5:302022-09-15T20:49:14+5:30
भाईंदरच्या उत्तन चौक भागातील सुमारे ६५० पेक्षा जास्त बोटी किनाऱ्यालाच
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रामुळे भाईंदरच्या उत्तन चौक भागातील सुमारे ६५० पेक्षा जास्त बोटी किनाऱ्याला लागल्या. ऐन मासेमारीच्या हंगामात मच्छिमारांना सात्यत्याने मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.
गेल्या काही दिवसां पासून सातत्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे . त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्या नंतर मच्छीमारांना किनाऱ्यावर परतण्यास सांगण्यात आले आहे . भाईंदरच्या उत्तन , पाली , चौक भागातील सुमारे ८०० मच्छीमार बोटी आहेत . तर त्या मोठ्या बोटी मध्ये व किनाऱ्यावर साहित्य ने आण आदी कामांसाठी सुमारे ४०० लहान बोटी आहेत. मध्यंतरी आलेल्या वादळा मुळे मच्छीमारांना मासेमारी साठी समुद्रात जाता आला नव्हते . तर जे गेले होते त्यांना परतण्यास सांगण्यात आले होते . त्या नंतर मासेमारी साठी गेलेल्या अनेक मच्छिमारांना जेलीफिश मोठ्या प्रमाणात जाळ्यात आल्याने त्या पुन्हा पाण्यात सोडून द्याव्या लागल्या होत्या . जेणे करून मासेमारी साठी जाऊन सुद्धा अनेकांचे नुकसान झाले होते.
आता कुठे मासळीचा हंगाम सुरु झाला असताना पुन्हा वादळ व पाऊस मुळे मच्छीमारांना किनाऱ्यावर परतावे लागले आहे . अनेक बोटी रिकाम्या हाताने परतल्या तर अनेक बोटी समुद्रात गेल्याच नाहीत . या मुळे खलाश्यांचे पगार सह डिझेल , किराणा , बर्फ आदींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . मासळी हाताला नाही आणि वरून नुकसान अश्या कात्रीत मच्छीमार सापडले असून त्यांना शेतकऱ्यां [प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.