Join us

'काही मूर्ख लोक...'; कोस्टल रोडवरुन मुंबईकरांवर संतापला जॉन्टी ऱ्होड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 4:11 PM

Mumbai News : मुंबई कोस्टल रोडवरील वाहनांच्या वेगावावरुन क्रिकेटपटूने मुंबईकरांना चांगलेच सुनावलं आहे.

Mumbai Costal Road : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित असा मुंबई कोस्टल रोड दोन महिन्यांपूर्वी झाला. कोस्टल रोडवरील वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका सध्या सुरु असून मुंबईकरांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईकरांना या प्रक्लपाची प्रचंड उत्सुकता होती. प्रकल्प सुरु झाल्यानंतरही हा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र काही अतिउत्साही मुंबईकरांमुळे परदेशी क्रिकेटपटूने रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या क्रिकेटपटूंनी मुंबईकरांना सुनावलं.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने गुरुवारी सोशल मीडियावर मुंबईत नव्याने सुरु झालेल्या कोस्टल रोडवरील ओव्हरस्पीडिंगचा मुद्दा मांडला. ११ मार्च रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला ११ किमीचा मार्गाचा कोस्टल रोड वांद्रे ते दक्षिण मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. मात्र रस्त्याच्या मोकळ्या पट्ट्यातून लोक ८० किमीची वेगमर्यादा ओलांडत असल्याच्या घटना दररोज घडत आहेत. कोस्टल रोडच्या रस्त्यावरील चिन्हे लोकांना चौथ्या लेनपासून जाऊ नका असे सांगतात. असं असताना कार देखील नियमितपणे बस लेनचा वापर करताना दिसत आहेत. यावरुनच जॉन्टी ऱ्होड्सने संताप व्यक्त केला.

जॉन्टी ऱ्होड्स हा त्याच्या रॉयल एनफिल्डवर टीमच्या हॉटेल्सपासून स्टेडियममध्ये नियमितपणे प्रवास करतो. ५४ वर्षीय खेळाडू ऱ्होड्स हा नियमितपणे भारताला भेट देतो. त्यामुळे मुंबईतील कोस्टल रोडचे बांधकाम होताना त्याने पाहिले आहे. मात्र कोस्टल रोड प्रकल्पावरील ओव्हर स्पीडींगच्या मुद्द्यावरुन जॉन्टी ऱ्होड्सने लोकांना हा स्वतःचा रेसिंग रोड आहे असे वाटत असल्याचे म्हटलं आहे.

"मला आठवते की मुंबई कोस्टल रोडचे काम पहिल्यांदा सुरू झाले तेव्हा हा वादग्रस्त मुद्दा होता. आता तो सुरु झाला आहे. तरी सर्वसामान्य मुंबईकरांची काय भावना आहे? मी हे टाईप करत असताना, काही मूर्ख लोकांना हा त्यांचा वैयक्तिक रेसिंग रोड वाटत आहे," असे ऱ्होड्सने म्हटलं आहे.

दरम्यान, कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे मोफत आहे. या रोडवर पहिल्या टप्प्यात २ बोगदे आहेत. मात्र,आता एकच बोगदा सुरू होणार आहे. कोस्टल रोड सोमवार ते शुक्रवार दरम्यान कार्यरत ठेवण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबई