होर्डिंग दुर्घटनाः भाजपने ठाकरेंना जबाबदार धरलं; भुजबळ म्हणाले, 'त्यांचा काय संबंध?'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:00 PM2024-05-14T12:00:30+5:302024-05-14T17:25:18+5:30
घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजपने उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी सुनावलं आहे.
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये सोमवारी बेकायद्यारित्या उभ्यारण्यात आलेले होर्डिंग कोसळल्यानेच १४ जणांचा मृत्यू झाला त ७४ जण जखमी झाले. वादळी वाऱ्यामुळे हे महाकाय होर्डिंग मुळासकट उखडले गेले आणि घाटकोपरच्या पंतनगर भागातील पेट्रोल पंपावर कोसळले. यामुळे शेकडो जण होर्डिंगखाली अडकले होते. एकीकडे १४ जणांचा होर्डिंगखाली दबून मृत्यू झाला तर दुसरीकडे या घटनेवरुन राजकरण सुरु झालं आहे. भाजपने या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांनीच ठाकरेंचा याच्याशी काय संबंध असा सवाल केला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला. या दुर्घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. भाजप आमदार राम कदम यांनी या घटनेसाठी उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. भावेश भिडे हे ज्या पेट्रोल पंपावर अपघात झाला त्याचे मालक आहेत. भावेश भिडेविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. राम कदम यांनी भावेश भिडे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एका फोटो पोस्ट केला. मात्र यावरुन छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सरकार आणि महापालिका आमची असल्याची म्हणत ठाकरेंचा याच्याशी काय संबंध असा सवाल केला आहे.
"१४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी १४ लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?," असं ट्वीट राम कदम यांनी केलं होतं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केलं.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) May 14, 2024
मनाला चीड आणणारे हे चित्र..
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते
हे या चित्रावरून स्पष्ट होते..
टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर..
आजही टक्केवारी साठी 14… pic.twitter.com/5OGtWxh2Pp
महापालिका आमचीच आहे - छगन भुजबळ
"सरकार, महापालिका आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा याच्याशी काय संबंध? असे अनेक व्यापारी पुष्पगुच्छ, मिठाई घेऊन आमच्याकडेसुद्धा येतात. फोटोही काढतात. त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सगळे होर्डिंग्ज नियमाप्रमाणे आहेत की नाही याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या संस्था किंवा महापालिकेने ही चौकशी पूर्ण केली पाहिजे. जर ते बेकायदेशीर आहे तर मग वेळ कशाला काढता? लोकांचे मृत्यू झाल्यावर तु्म्ही धाव घेणार सगळे," अशा शब्दात छगन भुजबळांनी सुनावलं.