मुंबई : ड्रग्ज तस्करावरील कारवाईदरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. यात पाच अधिकारी जखमी झाले आहेत. यांतील एकाची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यानंतरही एनसीबीने एक कोटीचे ड्रग्ज जप्त करीत एकाला अटक केली आहे.एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. मानखुर्द आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळांच्या बाजूला खाडीचा मोठा भाग आहे. या भागात चार ते पाच परदेशी नागरिक ड्रग्जचा व्यवसाय करीत होते. रोज संध्याकाळी ७ ते १० या वेळेत त्यांचा धंदा चालायचा. त्यानुसार वानखडे यांनी आपल्या पथकासह गुरुवारी (दि. १२) संध्याकाळी येथे छापा टाकला. यावेळी ड्रग्ज तस्करांंनी जवळील हत्यारे तसेच दगड फेकून हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच अमोल मोरे, प्रमोद मोरे, किरण रेवलकर, समीर साळेकर हे कर्मचारी जमखी झाले आहेत.एका नायजेरियन ड्रग्स तस्कराला अटकnयावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ओबीलार एकवेलार (वय २४) या नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत एक कोटी किमतीचे कोकेन, एमडीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे. यापूर्वीच्या एका कारवाईतही एनसीबीच्या पथकावर हल्ला चढविण्यात आला होता.
तस्करांचा ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांंवर हल्ला; ५ अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 8:02 AM