मुंबई - अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने आता लोअर परळचा रेल्वे पूल धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळेच हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी २४ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुरुस्तीपर्यंत हा पूल बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर हा पूल धोकादायक असल्याने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल बंद असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.