मुंबई : लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या लढाईत मुंबईवर अखेर उद्धव सेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवसेनेने लढवलेल्या चारपैकी तीन जागा - मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य आणि उत्तर पूर्व येथे विजय तर मिळविलाच शिवाय उत्तर मध्यमध्ये क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या लढाईत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या विजयाला हातभार लावला.
भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई उत्तर मतदारसंघातून पीयूष गोयल विजयी झाले आहेत. मात्र, येथे २०१९ च्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना मिळालेले ४.६५ लाखांचे मताधिक्य ते राखू शकले नाहीत. या निकालांवरून मुंबईवरील राजकीय वर्चस्वाचा फैसला झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकांचे आडाखे बांधले जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, असाच याचा अर्थ निघणार आहे.
उद्धव सेनेचे अरविंद सावंत यांनी मुंबई दक्षिण मतदारसंघात शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांचा ५२ हजार ६७३ अशा मताधिक्याने पराभव केला, तर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांनी शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यावर ५३ हजार ३८४ च्या मताधिक्याने मात करत राजकीय हिशेब चुकते केले आहेत.
अवघ्या ४८ मतांनी विजय -
उत्तर पश्चिम या मतदारसंघात उद्धवसेनेचे अमोल कीर्तीकर आणि शिंदेसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. फेरमतमोजणी आणि दावे-प्रतिदावे यात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या लढतीत वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले.
यश-अपयशाचा खेळ शेवटपर्यंत-
१) मुंबई उत्तरमध्ये काँग्रेसचा पुन्हा एक दारुण पराभव होत असताना या पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून सुमारे १६ हजार ५१४ मतांनी विजयी झाल्या. या मतदारसंघात यशाचे पारडे सतत हेलकावे खात होते.
२) उत्तर पूर्व मुंबईतील लढतही असाच काहीसा प्रकार झाला. येथून उद्धव सेनेचे संजय दिना पाटील २९ हजार ८६२ मतांनी विजयी झाले. येथेही यश-अपयशाचा खेळ शेवटपर्यंत सुरू होता.