मुंबई : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांनी मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून सलग १० व्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती. त्यामुळे निकम यांचा विजय एकतर्फी मानला जात होता. मात्र, त्या अकराव्या फेरीने महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या मतांचे चित्रच पालटले. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे सेनेची आणि काँग्रेसची पारंपरिक मते आघाडीला मिळाल्याने काँग्रेस तरले.
गोरेगाव, नेस्को येथे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत ४४,३७० मतांपैकी ४,०८३ मतांची लीड घेत महायुतीचे उमेदवार ॲड. निकम यांनी विजयाकडे धाव घेतली होती. पहिल्या फेरीत भाजपाच्या बड्या नेत्याच्या जेथे जाहीर सभा झाल्या होत्या त्या कुर्ला, चांदिवली आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ४ हजारहून अधिकची मते मिळाली. त्यापुढील प्रत्येक फेरीत निकम यांचे मताधिक्य १० ते १५ हजार मतांनी वाढत होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार गायकवाड यांचा पराभव निश्चित अशा चर्चांना उधाण आले होते. गायकवाड यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात म्हणजे वांद्रे पूर्व, कुर्ला आणि चांदिवली येथे कमी मते मिळाली होती.
लक्षवेधी लढत-
१) अचानक बदललेल्या या निकालामुळे मुंबई उत्तर मध्यची लढत लक्षवेधी लढतींपैकी एक ठरली आहे.
२) गेल्या दहा वर्षात काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला अल्पसंख्याक मतदार उद्धवसेनेकडे वळला आहे.
३) काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याची सभा झाली नसताना केवळ ठाकरे यांच्या आवाहनाने उद्धव शिवसैनिक आणि अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसला तारले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.