धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:46 AM2024-06-05T10:46:53+5:302024-06-05T10:49:17+5:30
Mumbai North East Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली.
मुंबई : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली. ते तेराव्या फेरीपर्यंत ३० हजारांच्या मतांनी आघाडीवर असतानाही भाजपने आता आपली आघाडी सुरू होत आपणच ही जागा जिंकणार, असा दावा केला. मात्र, १४व्या फेरीतही पिछाडी कायम राहिल्याने आपली सीट येणार नसल्याची चिंता उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या चेहऱ्यावर दिसून आली. अखेर २९ हजार ८६१ मतांनी पाटील यांनी आघाडी घेताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
पाटील यांनी पहिल्या फेरीत चार हजार ९२४ मतांनी आघाडी घेतली. तर, दुसऱ्या फेरीत ही आघाडी थेट १२ हजार ३४९ मतांवर गेली. पाचव्या फेरीपासून ही आघाडी २० हजारांपासून थेट कधी २७ हजार, तर कधी २३ हजारांपासून खालीवर होत राहिली. मात्र, तेराव्या फेरीपर्यंत तीन लाख दोन हजार ७०३ मते घेत ही आघाडी २८ हजारांवर गेली. या आघाडीनंतरही कोटेचा यांच्यासह कार्यकर्त्यांना विजयाची आशा होती. मात्र, १४ व्या फेरीत पाटील यांनी थेट ३० हजारांवर आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढलेली दिसली. कोटेचा सकाळपासून केंद्रात थांबून आढावा घेत होते.
१) १८व्या फेरीपासून पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रांबाहेर ढोल-ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. भाजप कार्यकर्त्यांनीही बाहेर पडण्यास सुरुवात केली.
२) दुसरीकडे, पाटील यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांसह गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली. तर, अखेर, सायंकाळी ६ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी पाटील यांच्या विजयाची घोषणा केली. जल्लोषात भर पडली. एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केलेला दिसून आला.
आरोग्यसेवकांची जागेसाठी वणवण-
१) विक्रोळीच्या मतमोजणी केंद्रात पालिकेच्या आरोग्यसेवकांसाठी जागाच नसल्याने त्यांची वणवण सुरू होती. रुग्णवाहिकेला आत प्रवेश न दिल्याने ती बाहेर थांबवावी लागली. डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने कर्मचारी इथे तिथे फिरताना दिसले.
२) अखेर, उन्हाने त्यांनाही त्रास झाल्याने त्यांनी रुग्णवाहिकेकडे मोर्चा वळवला. त्यात कामगारांना आत प्रवेश नसल्याने औषधांचा बॉक्स उचलून नेण्याची वेळ परिचारिकांवर आली.
३) दुपारनंतर काही कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्याने त्यांना रुग्णवाहिका गाठावी लागली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची उमेदवार प्रतिनिधी कक्षात व्यवस्था केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.