Join us  

साडेपाच लाखांच्या मताधिक्याचे स्वप्न अधुरे; पीयूष गोयल यांची साडेतीन लाखांनी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:50 AM

Mumbai North Lok Sabha Election Result 2024 : भाजपने कागदावर तरी निवडणुकीची रणनीती आखताना काही कसर सोडली नव्हती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासू मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून साडेपाच लाख मतांच्या आघाडीने निवडून आणण्याचे भाजपचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. लीड वाढविणे सोडाच, इथले आहे ते मताधिक्य टिकवणेही भाजपला शक्य झालेले नाही. तेही विरोधात ताकदीचा उमेदवार नसताना. 

माजी खा. गोपाळ शेट्टी यांना डावलून गोयल यांना तिकीट देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना रुचला नव्हता. गोयल यांची पॅरॅशूट उमेदवार म्हणून उपहास करणाऱ्या काँग्रेसचे भूषण पाटील यांनी फार नंतर प्रचार सुरू केला. त्या आधीच भाजप कार्यकर्त्यांत बाहेरचा उमेदवार म्हणून नाराजीचा स्वर उमटत होता. याची जाणीव असल्याने गोयल यांच्या मतदारसंघाच्या पहिल्या भेटीतच कार्यकर्त्यांना एकदिलाने गोयल यांच्या प्रचारात उतरण्याचे आवाहन पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले होते. गोयल यांना मताधिक्य मिळवून देणे हे प्रतिष्ठेचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी शेट्टींच्या ४.६५ लाखांच्या मतांच्या आघाडीपेक्षाही लाखभर अधिक मते घेऊन गोयल यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मतदारांशी कनेक्टच नाही-

भाजपने कागदावर तरी निवडणुकीची रणनीती आखताना काही कसर सोडली नव्हती. परंतु, गोयल यांचा प्रचाराचा भर स्थानिक मुद्यांऐवजी मोदी सरकारच्या योजनांवरच असे. स्थानिक प्रश्नांची जाण नसल्याने गोयल यांना मतदारांशी कनेक्टच होता येत नव्हते. त्यातच उद्धवसेनेची नसलेली साथ, निवडणुकीदरम्यान उभा राहिलेला मराठी गुजराती वाद, माशांच्या वासाचे प्रकरण याचा परिणाम भाजपचे मताधिक्य घटण्यात झाला.

प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात तर महायुतीतील शिंदेसेना, रिपाइंसारख्या अन्य लहान घटकांनाही फारसे गृहीत धरण्यात येत नव्हते. काही कार्यकर्ते याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत होते.

...तर फासे उलटे पडले असते

आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उद्धवसेनेचे माजी आ. विनोद घोसाळकर यांना तिकीट दिले गेले असते तर कदाचित येथे फासे उलटे पडले असते. गोयल यांच्या तुलनेत फारच उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने भूषण पाटील यांना प्रचारास फारसा वेळ मिळाला नाही.

टॅग्स :मुंबईपीयुष गोयलभाजपालोकसभा निवडणूक २०२४ निकाललोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४