परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 02:08 PM2024-06-15T14:08:44+5:302024-06-15T14:09:21+5:30
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रातील खोलीत मोबाईलवर बोलणाऱ्या रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
Ravindra Vaikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे विजयी झाले आहेत. वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ४८ मतांनी पराभूत केलं. मात्र मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी केला आहे. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. दुसरीकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी मतमोजणी केंद्राच्या खोलीमध्ये परवानगी नसताना मोबाईल फोनचा वापर केला गेल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भरत शाह यांच्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा होत आहे.
मोबाईल वापराच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तर तक्रार करणाऱ्या भरत शाह यांना या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात आल्याची माहिती एबीपी माझाने दिली. "४ जून रोजी वनराई पोलीस ठाण्यात भरत शाह यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर ही तहसीलदारांच्या नावाने दाखल केली आणि मला साक्षीदार बनवण्यात आलं. तसेच पोलिसांनी एफआयरची प्रत देखील देण्यास नकार दिला. ही तक्रार तहसीलदारांनी दिल्याचे पोलिसांनी म्हटलं," अशी माहिती भरत शाह यांनी दिली.
वनराई पोलिसांनी मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरण्याच्या आरोपाखाली शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांच्यासह निवडणूक आयोगाचा एन्कोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरु असताना दिनेश गुरवने पंडीलकर यांना मोबाईल पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे, ईव्हीएम जिथे ठेवले होते आणि मतमोजणी ज्या ठिकाणी झाली तिथले सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी मागणी अमोल कीर्तिकर यांनी नोडल अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्यात बसत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी कीर्तिकर यांना दिली आहे.