मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
By मनोहर कुंभेजकर | Published: May 27, 2024 07:06 AM2024-05-27T07:06:25+5:302024-05-27T07:08:14+5:30
या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे अमोल कीर्तिकर तर, महायुतीतर्फे रवींद्र वायकर रिंगणात आहेत.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा किंचित मतांची वाढ झाली असून, अल्पसंख्याक आणि मराठी मतदान कोणाच्या बाजूने होते, यावर विजयाची गणिते निश्चित होणार आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे अमोल कीर्तिकर तर, महायुतीतर्फे रवींद्र वायकर रिंगणात आहेत.
या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व, असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या ठिकाणी १७ लाख ३५ हजार ८८ मतदारांपैकी एकूण ९ लाख ५१ हजार ५८० म्हणजे ५४.८४ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये हे प्रमाण ९ लाख ४१ हजार ४१७ एवढे होते. त्यावेळची टक्केवारी ५४.३० टक्के होती. यंदा अंधेरी पश्चिममध्ये गिल्बर्ट हिल, दाऊद बाग, गावदेवी डोंगर, जुहू गल्ली, धाकूशेठ पाडा या अल्पसंख्याक भागात झालेले मतदान विजयासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ५७.११ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ही टक्केवारी ६०.४१ टक्के होती. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात १ लाख ६२ हजार ३५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ५४.७७ टक्के आहे. २०१९ मध्ये ही टक्केवारी ५७.११ टक्के होती.
विधानसभानिहाय आकडेवारी
विधानसभा २०१९ २०२४
जोगेश्वरी पूर्व ६०.४१ ५७.११
दिंडोशी ५७.११ ५४.७७
गोरेगाव ५२.७४ ५४.५३
वर्सोवा ४८.५२ ५३.१५
अंधेरी पश्चिम ५०.१६ ५३.६५
अंधेरी पूर्व ५७.३१ ५५.७३
एकूण ५४.३७ ५४.८४